महिला पोलिसामुळे प्रवासी बचावला
By admin | Published: September 4, 2014 11:42 PM2014-09-04T23:42:04+5:302014-09-05T00:18:54+5:30
एक प्रवाशाचा गहाळपणा त्याच्या जिवावर बेतला. मात्र,
कऱ्हाड : प्रवास करताना अनेकवेळा प्रवाशाचा गहाळपणा त्यांच्या जिवावर बेततो. दोन दिवसांपूर्वीही अशाच एक प्रवाशाचा गहाळपणा त्याच्या जिवावर बेतला. मात्र, संबंधित वाहनातूनच प्रवास करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखविल्यामुळे त्या प्रवाशाचा जीव बचावला.कऱ्हाड ते उंडाळे मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी एक रिक्षा दोन दिवसांपुर्वी कऱ्हाडातून प्रवासी घेऊन उंडाळेकडे मार्गस्थ झाली. भेदा चौकमार्गे ही रिक्षा शहरातील मोहिते हॉस्पीटलनजीक पोहोचली असता वळणावर दरवाजाच्या बाजूस बसलेल्या प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे संबंधित प्रवासी रिक्षाच्या दरवाजातून बाहेर फेकला गेला. हा प्रकार संबंधित प्रवाशाच्या शेजारी बसलेल्या महिला पोलीस मनिषा खराडे यांच्या निदर्शनास आला. मनिषा खराडे यांनी प्रसंगावधान ओळखून संबंधित प्रवाशाला पुन्हा रिक्षामध्ये खेचले. तोपर्यंत इतर प्रवाशांमध्ये गोंधळाची परीस्थिती झाली. चालकाने रिक्षा रस्त्याकडेला थांबविली. तसेच जिवघेण्या संकटातून बचावलेल्या प्रवाशाला इतर प्रवाशांनी धिर दिला. महिला पोलीस मनिषा खराडे यांनी दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे संबंधित प्रवासी बचावला.संबंधित प्रवाशासह रिक्षातील इतर प्रवाशांनी महिला पोलीस खराडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधनाबद्दल आभार मानले. (प्रतिनिधी)