अतीत महावितरणच्या भोंगळ कारभाराने भागातील शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:33+5:302021-06-10T04:26:33+5:30
नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) सह अतीत व परिसरातील गावात विजेचा खेळखंडोबा ही नित्याची बाब झाली आहे. या गोष्टीमुळे ...
नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) सह अतीत व परिसरातील गावात विजेचा खेळखंडोबा ही नित्याची बाब झाली आहे. या गोष्टीमुळे शेतकरी तसेच विविध ठिकाणी चालू असलेली कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागठाणे परिसरातील विजेवर चालणारे सॉ मिल, पिठाची गिरणी व घरगुती कारणासाठी वीज वापर करणाऱ्या लोकांना त्रास होत आहे. याबाबत वीज वितरणच्या परिसरातील केंद्राशी संपर्क साधला असता, महापारेषणच्या अतीत येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अशी परिस्थिती उदभवल्याचे समोर आले.
अतीत येथील महापारेषणच्या उपकेंद्रातून महावितरणच्या गणेशवाडी, भटमरळी, शेंद्रे, परळी, कालगाव, तारगाव, अंगापूर, तारळे आदी उपकेंद्रांना वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणारी उच्चदाब वहिनी बंद पडल्यास ई-मेल केला जातो. परंतु -मेल करूनही वीजपुरवठा करण्याबाबत जाणून बुजून विलंब केला जातो. एक उच्चदाब वाहिनी बंद असेल, तर परिसरातील ५० गावांचा वीज पुरवठा बंद राहतो. अतीत महापारेषणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. तसेच सध्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांना याचा त्रास होत आहे. यामुळे महापारेषणच्या या भोंगळ कारभाराविरोधात परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चौकट
अन्यथा आंदोलन छेडू..
महापारेषणच्या अतीत विभागाने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जर कारभारात सुधारणा केली नाही, तर नागठाणे परिसरातील शेतकरी आंदोलन करणार आहेत, असा इशारा शेतकरी गणेश साळुंखे यांनी दिला आहे.