पर्याय पाटीला... आराम पाठीला!
By admin | Published: June 29, 2015 10:48 PM2015-06-29T22:48:55+5:302015-06-30T00:20:54+5:30
अभिनव कल्पना : माण तालुक्यातील घुणेवस्ती शाळेतील विद्यार्थी करतायत फरशीचा पाटीसारखा उपयोग
सातारा : कोवळ्या जिवांवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी ‘लोकमत’ने जागृती मोहीम छेडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील अनेक शाळांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत वेगवेगळे बदल केले. माण तालुक्यातील घुणेवस्ती-पानवण येथील मराठी शाळेने तर एक अभिनव कल्पना सत्यात उतरविली आहे. शाळेतील फरशीलाच काळा रंग देऊन विद्यार्थी फरशीचा पाटीसारखा वापर करत आहेत. मुलं ‘अआई’पासून ते गणिताची आकडेमोडही या पाटीवर करत आहेत.माण तालुक्यातील पानवणशेजारी घुणेवस्ती येथे पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. ग्रामीण भागातील ही शाळा वाड्यावस्त्यांवरील मुलांसाठी जणू एक आनंददायी शिक्षणाचं केंद्र बनली आहे. येथील शिक्षक नेहमी आगळेवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे ही एक गंभीर समस्या असून या शाळेने इतरांपेक्षा हटके उपाय शोधून त्याची अंमलबजावणीही केली आहे.शाळेचे शिक्षक शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, पानवण गावाशेजारील ही शाळा अतिशय ग्रामीण भागात आहे. ऊसतोड मजुरांची मुले या शाळेत शिकतात. त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी मुख्याध्यापक कल्याण भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांना शिक्षणाचं ओझं न वाटता हसत-खेळत शिकता यावं यासाठी शाळेचं संपूर्ण रुपडं बदलून टाकलं आहे. शाळेतील वातावरण नेहमी आनंदी आणि तणावमुक्त राहावं, यासाठी शाळेच्या भिंतीवर निसर्गचित्रे काढण्यात आली आहेत. झाडे-वेली, फुले, पक्षी, बागडणारी मुलं अशा चित्रांमुळे शाळेच्या भिंती जणू बोलक्या झाल्या आहेत. फक्त भिंतीच नव्हे तर शाळेच्या ओट्यावरही निसर्गचित्र रेखाटली आहेत. त्यामुळे मुलं उत्साहानं शिक्षण घेत आहेत. (लोकमत चमू)
आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दप्तराचं ओझं कमी व्हावं, यासाठी शाळेतील फरशीचा पाटीसारखा वापर केला जात आहे. दप्तर शाळेत ठेवता यावे, यासाठी प्रत्येकासाठी रॅकची सोय केली आहे.
- कल्याण भागवत,
मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, घुणेवस्ती-पानवण
सर्व विद्यार्थी संगणक साक्षर
घुणेवस्ती शाळा ही ग्रामीण भागातील शाळा आहे. ग्रामीण भाग असला तरी येथील लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून लोकसहभागातून शाळेला संगणक, लॅपटॉप देण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने संगणक हाताळता येतो.
लोकसहभागामुळे शाळेची प्रगती
घुणेवस्तीवरील लोक शाळेच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ते आग्रही आहेत. शाळेचा शिक्षकवर्ग आनंददायी शिक्षणासाठी नेहमतीच प्रयत्नशील असतो. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व ग्रामस्थांना शाळेत निमंत्रित केले जाते. गुढी उभारून आणि मिष्ठान्न देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते.
दप्तर ठेवण्यासाठी रॅकची सुविधा
शाळेने मुलांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी व्हावं, यासाठी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र रॅकची सुविधा दिली आहे. विद्यार्थी आपले दप्तर त्यांच्या रॅकमध्ये ठेवतात. अभ्यासापुरत्या वह्या, पुस्तके दप्तरात राहत असल्यामुळे ओझे कमी झाले आहे.