पाटणला ‘मराठा मोर्चा’चे ठिय्या आंदोलन परिसरात घोषणा : व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:15 AM2018-07-22T00:15:06+5:302018-07-22T00:21:01+5:30
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने शनिवारी पाटण येथे मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सर्वांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले
पाटण : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने शनिवारी पाटण येथे मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सर्वांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले. या आंदोलनाला पाटण तालुक्यातील हजारो मराठा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
पाटण येथील झेंडा चौकात सर्व मराठा समाजबांधव एकत्रित आले. यावेळी सर्व समाजबांधवांनी चौकातून तहसील कार्यालयावर पायी चालत मोर्चा काढला. तसेच पाटण तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी मराठा समाजाला संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे. ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आता रडायची नाही तर लढाईची वेळ आली आहे,’ असा इशारा समाजबांधवांच्या वतीने सरकारला देण्यात आला.
‘आजपर्यंत मराठा समाजाने शाततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत शासनाने नवीन भरती करू नये. ही वादळापूर्वीची शांतता आहे. आम्हाला आमचा हक्क द्या,’ अशा तीव्र भावना मराठा समाजातील युवकांनी ठिय्या आंदोलनावेळी व्यक्त केल्या.
पाटण येथे शनिवारी मराठा समाजबांधवांनी केलेल्या ठिय्या आंदोलनास शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. यावेळी काढलेल्या मोर्चात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत,’ अशा घोषणा समाजबांधवांनी दिल्या. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आला असता सर्वांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला. त्यानंतर संजय इंगवले, चंद्रहार निकम, सुरेश पाटील, दिनकर माथने यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि तहसीलदार रामहरी भोसले यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा सर्वांमुळे शांततेत पार पडला. मोर्चास पाटण तालुक्यातील शेकडो बांधव सहभागी झाले होते. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाकडून खबरदारी
पाटण पोलीस स्टेशन प्रशासनाच्या वतीने सकाळी सुरू करण्यात आलेला बंदोबस्त सायंकाळी सात वाजेपर्यंत उशिरापर्यंतही ठेवण्यात आला होता. तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चावेळी व ठिय्या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात करण्यात आला होता.