पाटणला अर्ध्या तालुक्यावर बिबट्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:44 PM2018-09-16T22:44:11+5:302018-09-16T22:44:17+5:30
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर्ध्या तालुक्यातील जनता बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र आहे.
पाटण तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आजपर्यंत त्याने मानवावर हल्ला केला नाही. मात्र, मानवी वस्तीत येऊन तो मोकाट, पाळीव श्वान, शेळ्या, लहान रेडके यांच्यावर हल्ला करत असल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, मानवी वस्त्या बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र दिसत आहे. आजपर्यंत विविध कारणास्तव तालुक्यात झालेली बेसुमार वृक्षतोड, लोकसंख्या वाढ झाल्यामुळे शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जंगलक्षेत्रात केलेले सपाटीकरण, नष्ट होत असलेली वनसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली आहेत. याशिवाय जंगल परिसरात लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार खुलेआम केली जात असल्याने वनप्राण्याच्या खाद्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे खाद्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे शेतात काम करण्यास जाणारे शेतकरी, शेतमजूर, सकाळी व्यायाम करण्यास जाणारे ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने चाफळ भागात लावलेला पिंजºयाने पूर्ण पावसाळा सोसला. ठोस कार्यवाही न झाल्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अर्धा तालुका बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे दिसते. दोन-तीन वर्षांपासून बिबट्या मानवी वस्तीजवळ लहान-मोठ्या पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
...या गावांत बिबट्याचा मुक्काम
उरूल, विहे, मोरगिरी, चाफळ, मारूल हवेली, दिवशी बुद्रुक विभागात असे प्रकार सतत घडत आहेत. उरूल भागातील ठोमसे, उरूल घाट, विहे घाट येथे तर बिबट्या मुक्कामालाच आहे. उरूल घाटात पाटण-उंब्रज मार्गावर डोंगराच्या आसपास त्याचे दर्शन प्रवाशांसह ग्रामस्थांच्यासाठी नित्याचीच बाब झाली आहे. उरूल, मल्हारपेठ, विहे, मोरगिरी, मारूल हवेली भागातील वाडीवस्तीवरील लोक वस्तीत घुसून बिबट्याने घराजवळ असणाºया जनावरांच्या शेडवर हल्ला करून अनेक पाळीव जनावरांना ठार केले आहे.
वन संरक्षण समित्या कागदावर
तालुक्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती लुप्त होऊ लागली असून, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. केवळ कागदावरच असणाºया वन संरक्षक समित्या, जंगल परिसरात मानवाचा वाढता हस्तक्षेप, छुपी वृक्षतोड, वन्यप्राण्यांची होणारी चोरटी शिकार, लोकसंख्या वाढीमुळे वनसंपदेवर आलेले संकट आदी कारणांमुळे तालुक्यातील वनवैभव व वन्य प्राण्यांची दहशत चर्चेत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.