पाटणचे पोलीस ‘लाईनी’तून फ्लॅटमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:33 PM2018-12-17T22:33:01+5:302018-12-17T22:34:37+5:30
पाटण : गत अनेक वर्षे पाटणला ड्यूटी बजावणारे पोलीसदादा अत्यंत मोडकळीस आलेल्या गळक्या आणि शेडवजा असलेल्या कॉलनीत राहत होते; ...
पाटण : गत अनेक वर्षे पाटणला ड्यूटी बजावणारे पोलीसदादा अत्यंत मोडकळीस आलेल्या गळक्या आणि शेडवजा असलेल्या कॉलनीत राहत होते; पण आता पोलिसांचे हे दिवस लवकरच बदलणार असून, पाटणचे पोलीस आता नव्या कोऱ्या वास्तूमध्ये प्रवेश करणार आहेत. पोलिसांसाठी बांधलेल्या तीनमजली भव्य इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच पोलिसांना या इमारतीत फ्लॅटचे वाटप होणार आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार शंभूराज देसाई आणि तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पाटण शहरात पोलीस वसाहत अर्थात तीन मजली इमारत उभी करण्याचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर आजअखेर या इमारतीचे वेगाने बांधकाम सुरू आहे. आता ही इमारत रंगरंगोटी करण्याच्या टप्प्यावर आली आहे.
तत्पूर्वी याचठिकाणी असणारी जुनी शेडवजा पोलीस वसाहत पाडून नवीन वसाहत बांधकाम करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या जुन्या इमारतीत राहत असलेले पोलीस कुटुंबीय येथील अत्यंत गैरसोयीला कंटाळून इतरत्र राहू लागले होते. अद्याप एक जुनी पोलीस लाईन उभी आहे. त्यात काही पोलीस आपल्या कुटुंबासमवेत राहतात. मात्र, हा वनवास आता लवकरच संपणार आहे. कारण जुन्या पोलीस वसाहतीत ना पुरेसे पाणी, ना शौचालय सुविधा आणि वसाहतीचे छप्पर गळके. तेही कौलारू होते. त्यामुळे याठिकाणी नवी इमारत होणे अपेक्षित होते. आमदार शंभूराज देसाई यांनी पोलीस वसाहतीस निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला. आता ही इमारत काही महिन्यांतच खुली होऊन पोलिसांना येथे हक्काचे घर मिळणार आहे.
पाटण पोलीस ठाण्यात एकूण ४० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या पोलीस इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत या नव्या इमारतीत पोलीस कर्मचारी वास्तव्यास जातील, अशी अपेक्षा आहे. नव्या इमारतीत दोन पोलीस अधिकारी, बारा पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय राहतील एवढी क्षमता आहे.
- यू. एस. भापकर, सहायक पोलीस निरीक्षक, पाटण
पाटण येथे पोलीस गृहसंकुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.