अजितदादांच्या सूचनांनी पाटण तालुका ‘चार्ज’!

By admin | Published: January 26, 2016 12:48 AM2016-01-26T00:48:01+5:302016-01-26T00:48:01+5:30

पाटणला ‘चौकार’, ढेबेवाडीत ‘षटकार’ : कुणाला चिमटा तर कुणाचे काढले वाभाडे; आठ दिवसांत उडाला राजकीय धुरळा

Patan taluka charge 'Ajitadad's instructions! | अजितदादांच्या सूचनांनी पाटण तालुका ‘चार्ज’!

अजितदादांच्या सूचनांनी पाटण तालुका ‘चार्ज’!

Next

रवींद्र माने ल्ल ढेबेवाडी
राष्ट्रवादीच्या संघप्रमुखांसह टिमलिडरनेही आपल्या अष्टपैलू खेळाडूंसह अवघ्या दहा दिवसांत पाटण तालुक्याच्या राजकीय मैदानावर चौकार-षटकारांची चौफेर फटकेबाजी करून संघातील खेळाडंूना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील मॅच जिंकण्याबरोबर राज्याची सिरीज जिंकण्याच्या सूचना मोठ्या साहेबांसह छोट्या दादांनी केल्याने पाटण तालुका चार्ज झाला आहे.
नवीन वर्षाच्या प्रारंभीच १० जानेवारी रोजी पाटणच्या मैदानावर राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार आपल्या निवडक; पण अष्टपैलू खेळाडू त्यामध्ये विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक- निंबाळकर, माजीमंत्री जयंत पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर आदींसह दाखल झाले. त्यांनी तालुक्याच्या जनतेसमोर सुमारे पन्नास वर्षांपासूनचा इतिहास वाचून दाखविला.
राजकीय फटकेबाजीबरोबरच माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकरांचा राजकीय प्रवास कथन केला. त्यांच्या पहिल्या निवडणुकीतील पराभवापासून अगदी सहा वेळा जनतेने त्यांना कसे निवडून दिले. याचा उहापोह शरद पवार यांनी केला. सत्यजितसिंह पाटणकर यांनी पहिल्या पराभवाने खचून न जाता जिद्दीने उभे राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या तालुक्यात पहिल्या पराभवानंतर २६ वर्षे सलग राज्य करता येते. हा तालुक्याचा इतिहास सांगून तालुक्यात पुन्हा एकदा पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. तर विधानपरिषदेचे सभापती रामराजेंनी बच्चूदादांच्या आक्रमक भाषणाचे कौतुक करत जनतेसाठी काम करत राहण्याच्या सूचना केल्या. माजीमंत्री जयंत पाटील यांनी मात्र, सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवत स्थानिक पक्षनेत्यांच्या कार्याची खिल्ली उडविली.
दहा दिवसांपूर्वी पाटणमध्ये मोठ्या साहेबांनी उडवलेला ‘धुरळा’ बसतोय न बसतोय तोपर्यंत आमदार नरेंद्र पाटील यांनी ढेबेवाडीच्या मैदानावर छोट्या साहेबांना पाचारण करून ‘माथाडी स्टाईल’ फटकेबाजी केली. अजितदादांनी संयमाने फलंदाजी करत राज्य आणि केंद्र शासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. एवढे करून थांबतील ते दादा कसले? त्यांनी जयाभाऊंच्या आंदोलनाचा समाचार घेतला. आणि शेवटी तर पाटणच्या मैदानावरची ‘मॅच’ जिंकून सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी ‘नंबरवन’ करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या.
अगदी दहा दिवसांच्या अंतरात राष्ट्रवादीच्या प्रमुखांसह टिमलिडर आणि अष्टपैलू खेळाडूंनी दणकेबाज फलंदाजी केल्याने घराण्याभोवती फिरणाऱ्या या तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात माथाडीसह आमदार नरेंद्र पाटील यांनी दिमाखदार ‘एन्ट्री’ केल्याने राष्ट्रवादी पक्ष उभारी घेईल, अशी आशा कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांची साखरपेरणी करण्याचा प्रयत्न या दोन्ही कार्यक्रमातून केला असल्याने आता जनतेचे लक्ष सत्ताधारी आमदारांसह राष्ट्रीय काँग्रेसच्या नियोजित कार्यक्रमांसह त्यांच्या भूमिकांकडे लागले आहे.
उदयनराजे, सारंग पाटील अनुपस्थित
दोन्ही मैदानावर पक्षप्रमुखांसह आजी-माजी आमदार, मंत्र्यांनी पक्षबळकटीच्या सूचनावजा कानमंत्र दिला. मात्र, या प्रक्रियेत याच तालुक्याचे सुपुत्र सिक्कीमचे राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सारंग पाटील यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली, हे मात्र निश्चित !

Web Title: Patan taluka charge 'Ajitadad's instructions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.