पतंगराव कदम : राज्यातील महायुती कर्तृत्वशून्य असल्याची टीका
By admin | Published: September 6, 2014 12:08 AM2014-09-06T00:08:05+5:302014-09-06T00:10:38+5:30
जिल्ह्यात गतवेळचाच फॉर्म्युला
सांगली : राज्यातील महायुती कर्तृत्वशून्य आहे. त्यामुळेच काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिवास्वप्न ठरेल. लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल, अशा भ्रमात महायुतीने राहू नये, अशा शब्दांत पालकमंत्री पतंगराव कदम यांनी आज, शुक्रवारी येथे पत्रकार बैठकीत भाजपच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, काँग्रेस हा विशाल पक्ष आहे. खेड्यापाड्यापासून वाड्यावस्तीपर्यंत पक्षाचा विस्तार झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता; म्हणून काँग्रेस संपली नाही. उलट पक्षाने गरूडभरारी घेतली होती. काँग्रेसने जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. लोकसभेवेळी भाजपची हवा होती. त्यामुळेच केंद्रात बदल झाला. आता विधानसभेवेळीही तेच घडेल, या भ्रमात कोणी राहू नये. महायुतीला सर्वच मतदारसंघात मातब्बर उमेदवार मिळालेले नाही. त्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादीतील उसनवार उमेदवार घेतले जात आहेत. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी ९९ टक्के निश्चित आहे. केवळ आघाडीची घोषणा होणे बाकी आहे. दोन्ही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवारांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठविली आहे. आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)
जमिनी परत मिळणार
राज्यात पाटबंधारे विभागाने पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले आहे. मात्र या जमिनीचा वापर पुनर्वसनासाठी झालेला नाही. या जमिनीवर ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असा शेरा मारला गेल्याने या जमिनी शेतकऱ्यांना विकता येत नव्हत्या. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने अशा जमिनीवरील शेरा कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या क्रांतीकारी निर्णयामुळे वापर न झालेली जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यात गतवेळचाच फॉर्म्युला
सांगली जिल्ह्यातील जागा वाटपाचा गतवेळचा फॉर्म्युला कायम राहणार आहे. काँग्रेसने जतच्या जागेची मागणी केली आहे. अपक्षांनी ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य स्वीकारले आहे, त्या पक्षाला संबंधित जागा मिळणार आहे. पलूस-कडेगावमध्ये निवडणूक आल्यावरच विरोधकांकडून नौटंकी सुरू होते. त्यात नवीन काहीच नाही. मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, हेही जनतेला चांगलेच माहीत असल्याचा टोलाही त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांचे नाव न घेता लगावला.