पवारांनी मनावर घेतल्यास पाटणकर पूर्वपदावर...
By admin | Published: January 10, 2016 12:46 AM2016-01-10T00:46:27+5:302016-01-10T00:46:27+5:30
पाटण दौरा : तालुक्यातील राष्ट्रवादीअंतर्गत मतभेद!
पाटण : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी पाटण तालुक्यात येत असून, शेतकरी मेळाव्यात ते तालुक्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाला तालुक्यातीलच राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित राहणार का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्याहीपेक्षा विधानसभेतील पराभवाला राष्ट्रवादीअंतर्गत मतभेदाची किनार असल्याचे उघड आहे. म्हणूनच शरद पवारांनी मनावर घेतले तर आगामी आमदारकी राष्ट्रवादीच्या ताब्यात येणे सोपे होईल आणि पाटणकर गट पुन्हा सत्तेच्या पूर्वपदावर येर्ईल.
पाटण तालुक्यात राष्ट्रवादीची एकास एक अशी दिग्गज मंडळी आहेत. हे सगळे दिग्गज कोणामुळे आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यातीलच सिक्कीमचे राज्यपाल आणि दोन वेळा खासदारकी सांभाळलेले श्रीनिवास पाटील याच तालुक्यातील. त्यांचे पुत्र सारंग पाटील यांनासुद्धा राष्ट्रवादीने पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दिली. दुसरीकडे माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. तिसरीकडे राज्याचे बांधकाम मंत्रिपद मिळविलेले माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर. एवढी सगळी राष्ट्रवादीची ताकद असताना पाटणची आमदारकी हातातून जाते. याचाच अर्थ राष्ट्रवादीतच रुसवे-फुगवे होते.
याची कुणकुण पक्षश्रेष्ठींना असेलच, तरीसुद्धा लक्ष घालण्यावाचून राहिले आणि पाटणच्या २६ वर्षांच्या सत्तेला तडा गेला. आता तडा मोठे भगदाड होऊ लागले असून, दुरावा कायम आहे. त्यामुळेच सध्या निव्वळ पाटणकर समर्थकच विद्यमान आमदार शंभूराज देसार्इंशी दोन हात करताना दिसतात. बाकीच्यांनी नेते आणि राष्ट्रवादी पक्षाशी बांधील राहणेच पसंत केल्याचे दिसते. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणारे खासदार, आमदार आता एकमेकांची विचारपूसही करताना दिसत नाहीत. या सर्वांवर बहुगुणी मात्रा म्हणजे शरद पवार हेच आहेत. (प्रतिनिधी)
पाटणकरांच्या व्यासपीठावर कोण कोण?
बऱ्याच दिवसांनंतर शरद पवार पाटण तालुक्यात येत असून, जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांच्या भेटीला येणार आहे. पण पाटण तालुक्यातील रथी-महारथी रविवारी होणाऱ्या पाटण येथील शेतकरी मेळाव्यात दिसणार का? विक्रमसिंह पाटणकरांच्या व्यासपीठावर यापूर्वीही शरद पवार आले असताना राष्ट्रवादीच्या काहींनी पाठ फिरविली होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे लक्ष लागून राहिले आहे.