पाटणकर पिता-पुत्र दोन वर्षे होते कुठे?

By admin | Published: December 31, 2016 12:07 AM2016-12-31T00:07:14+5:302016-12-31T00:07:14+5:30

शंभूराज देसार्इंचा सवाल : मरळीला युवक मेळावा; निवडणूक आली म्हणून हात जोडतात, पराभवानंतरही मी तालुक्यात फिरलो होतो

Patankar's father-son was two years? | पाटणकर पिता-पुत्र दोन वर्षे होते कुठे?

पाटणकर पिता-पुत्र दोन वर्षे होते कुठे?

Next

पाटण : ‘२००९ च्या पराभवानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बाहेर पडून मी ५ वर्षे दिवसरात्र तालुक्यात फिरलो. सत्ता नसताना कामे केली. म्हणून १८,८२४ मतांनी विजयी झालो. मात्र, पराभव झालेल्या पाटणकर पिता-पुत्रांनी गेली दोन वर्षे तोंड लपवून घेतले. निवडणुका आल्या म्हणून हात जोडणारे पिता-पुत्र होते कुठे?,’ असा सवाल आमदार शंभूराज देसाई यांनी केला.
दौलतनगर मरळी, ता. पाटण येथे आयोजित तालुक्यातील युवकांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार देसाई म्हणाले, ‘सत्यजित पाटणकर आता म्हणताहेत निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यांचे हसू येत आहे. ते असे का म्हणतात याचा शोध घेतला असता शरद पवारांनी दिलेल्या १ कोटी रुपये निधीतील भूमिपूजने पाटणकर करत असल्याचे समजले. मोरणा भागात मी एका दिवसात १२ कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने केली आहेत. तर आमदार झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत १७५ कोटींची कामे तालुक्यात केली आहेत. विक्रमसिंह पाटणकरांनी बांधकाम मंत्री असताना राज्याच्या एका वर्षाच्या बजेटमधील ३ हजार कोटींच्या निधीपैकी ५ वर्षांत ११५० कोटी रुपये तरी पाटणसाठी आणायचे होते. २०१४ सालापासून मी ‘जनता दरबार’ ही संकल्पना तालुक्यात राबविली. त्याद्वारे आजअखेर ६६२ पैकी ६१० लोकांची कामे केली आहेत. तारळी धरणाचे पाणी माढा मतदार संघात पळविण्याचा निर्णय पाटणकर आमदार असताना झाला होता. तो मी रद्द करून घेतला आहे.
लोकनेत्यांच्या भव्य स्मारकासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या स्मारकाचे काम चालू असून, यामध्ये तरुणांसाठी स्टडी सेंटर सुरू करणार आहे. भूकंपग्रस्त दाखले १९९५ मध्ये पाटणसाठी बंद झाले होते. ते सुरू करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विनंत्या केल्या. दुर्दैवाने निर्णय झाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जी. आर. काढून पाटणसाठी दाखले सुरू केले. आजपर्यंत ५८१ भूकंप दाखले देण्यात आले असून, त्याचा उपयोग तरुणांना झाला. पाटणकरांच्या २१ वर्षांच्या निष्क्रीय कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने पाटण तालुक्यात परिवर्तनाची सुरुवात झाली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी २००४ मध्ये लढाई झाली. त्यामुळेच राज्याच्या कॅबिनेटमंत्र्यांचा पराभव तालुक्यातील जनतेने
केला.
उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार वशिल्याने मिळविला, असे पाटणकर म्हणतात. मात्र, त्यांना मला सांगायचे आहे की, मला पुरस्कार मिळाला त्यावेळी तुमचेच सरकार राज्य व केंद्रात होते. मी तर विरोधी पक्षाचा आमदार होतो. विधानसभेत डुलक्या मारून पुरस्कार मिळत नाही, अशी टीकाही आमदार शंभूराज देसाई यांनी केली.
पाटणकरांनी तोंड उघडले नाही म्हणूनच १५ वर्षे भूकंप दाखले मिळाले नाहीत आणि तरुणांच्या दोन पिढ्या नोकरीपासून वंचित राहिल्या,’ असा आरोप शंभूराज देसार्इंनी केला.
यावेळी रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, भरत साळुंखे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, अ‍ॅड. मिलिंद पाटील उपस्थित होेते.
यावेळी पी. एल. माने (गिरेवाडी), भगवान माने, आनंदराव माने, बापूराव माने (मानेगाव), वसंत पवार (शिंगणवाडी), शंकर भिसे (नाटोशी), अजित कदम (मल्हारपेठ), अशोक शेळके (आबदारवाडी) यांनी देसाई गटात प्रवेश केला. (प्रतिनिधी)
यशराज देसार्इंचे पहिले भाषण
आमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांनी युवक मेळाव्यात पहिलेच भाषण करून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केल्याचे दिसले. यशराज देसाई म्हणाले, ‘आपल्या तालुक्याचे आमदार जोपर्यंत लालदिव्याच्या गाडीत बसणार नाहीत, तोपर्यंत युवकांनी स्वस्थ बसू नये.’ त्यावर उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई भाषणात गहिवरले.
इच्छुकांना बोलण्याची संधी...
‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्यांना आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली जाईल. त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. इच्छुकांचे एकमत करून एकासाठी शिक्कामोर्तब केले जाईल. नाहीतर माझा निर्णय अंतिम राहील,’ असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.

Web Title: Patankar's father-son was two years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.