सातारकरांनो 'या' ठिकाणी जाताय? काळजी घ्या!, जाणून घ्या धोकादायक ठिकाणं

By दीपक शिंदे | Published: June 28, 2023 02:20 PM2023-06-28T14:20:46+5:302023-06-28T14:21:22+5:30

पावसामुळे डोंगरावरील वाटा, रस्ते होताहेत घसरडे

Paths and roads between mountains and valleys began to slip, Satarakars are concerned about safety | सातारकरांनो 'या' ठिकाणी जाताय? काळजी घ्या!, जाणून घ्या धोकादायक ठिकाणं

छाया : जावेद खान

googlenewsNext

सातारा : आरोग्याच्या बाबतीत सातारकर सजग झाले असून, आबालवृद्धांची बाराही महिने निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती सुरू असते. कोणी अजिंक्यतारा सर करतो तर कोणी चार भिंतीचे पठार. कोणी यवतेश्वर घाटमार्गे कास पठाराकडे जातो तर काहीजण मोकळ्या मैदानात धावणे व चालण्याचा व्यायाम करतात. आता पावसाळा सुरू झाल्याने डोंगर-दऱ्यातील वाटा, रस्ते घसरडे होऊ लागले असून, नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

पावसाळ्यातील काही धोकादायक ठिकाणं

यवतेश्वर डोंगर : यवतेश्वर डोंगरातून सांबरवाडीकडे पायी चालत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा डोंगर तीव्र उताराचा आहे. चुकून जर एखाद्या व्यक्तीचा चालताना तोल गेलाच तर पायवाटेवरील खडीवरून घसरुन कपाळमोक्ष झालाच समजा. पावसाळ्यात या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.

 मंगळाई देवी परिसर : अजिंक्यतारा किल्ल्यावरील खालच्या मंगळाई देवी मंदिराच्या मागील बाजूस घनदाट जंगल आहे. या जंगलात हौशी नागरिक चालण्यासाठी नेहमीच येत असतात. पावसाळ्यामुळे येथील पायवाटांवर चिखल साचतो. शिवाय पाला ओला झाल्याने त्यावरुन घसरण्याचा धोकाही संभवतो.

महादरेतील पायऱ्या : महादरे गावातून यवतेश्वरकडे जाण्यासाठी ऐतिहासिक दगडी पायऱ्या आहेत. एक ट्रेकिंग पॉइंट म्हणून या पायऱ्यांकडे पाहिले जाते. हा परिसर देखील जंगलाने व्यापलेला असून, पायऱ्यांचे दगड पावसात गुळगुळीत होतात. त्यामुळे येथे भटकंतीसाठी जाणे जोखमीचे ठरते.

महामार्गावरील सेवा रस्ते- काही हौशी सातारकर भल्या पहाटे पुणे-बंगळुरु महामार्गावरील सेवा रस्त्यावर चालण्याचा, धावण्याचा सराव करतात. या मार्गावर वाहने भरधाव वेगात निघून जातात. भरधाव वाहनांनी आजवर कितीतरी पादचाऱ्यांना धडक दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणे बंद करावे.

ही दक्षता घ्याच...

  • पावसाळ्यात चालणे अथवा पळण्याचा व्यायाम करत असाल तर पावसाळी चपला व शूज, रेनकोटचा वापर करा
  • चालण्यासाठी शक्यतो मोकळी मैदाने अथवा जिथे वाहनांची रहदारी कमी आहे अशीच ठिकाणे निवडा
  • डोंगरावर, जंगलात जाण्याचे धाडस शक्यतो करू नये
  • ज्यांना पावसात घराबाहेर जायचे नाही अशा व्यक्ती घरात देखील कार्डीओ व्यायाम करु शकतात
     

Web Title: Paths and roads between mountains and valleys began to slip, Satarakars are concerned about safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.