महिला आरक्षणामुळे पतिराजांची धावपळ
By admin | Published: December 22, 2016 11:20 PM2016-12-22T23:20:10+5:302016-12-22T23:20:10+5:30
पुसेसावळी गट : तिन्ही जागा महिलांसाठी राखीव
राजीव पिसाळ ल्ल पुसेसावळी
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुसेसावळी जिल्हा परिषद गटात तिन्ही जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला संधी नाही मिळाली तरी घरातून बाहेर जाऊ नये म्हणून सौभाग्यवतींना तिकीट मिळावे, यासाठी पतिराजांची धावपळ सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण बदलल्यामुळे जिल्हा परिषद उमेदवारांच्या संख्येत वाढ होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे अनेकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
निवडणूक समोर आली की, नेत्यांसह भावी उमेदवारांना प्रत्येक मतदार महत्त्वाचा वाटतो. परिसरातील यात्रा, जत्रांना नेते मंडळींची वाढती उपस्थिती निवडणुकांची चाहूलच असल्यानेच दाखवत आहे.
आपापल्या नेत्यांचे कार्यकर्ते कामांना लागलेले दिसत आहेत. गावागावांत आता गप्पा रंगू लागल्या आहेत की, ‘उमेदवारी कुणाला मिळणार, कोणता उमेदवार उभा राहिल्यास कोणत्या पक्षाला फायदा होईल, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की खर्चीक उमेदवारांना? की नाराजांची फळी तिसरा पर्याय म्हणून उभी राहणार?’ अशा अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. निवडणुकीच्या आधीच उभे राहिलेल्या उमेदवारांचे बंड थोपावणे नेतेमंडळींना अवघड जाणार, हे मात्र
निश्चितच.
त्यातच नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाने थोड्या फार प्रमाणात मारलेल्या मुसंडीमुळे जनसामान्यात एक वेगळी क्रेझ निर्माण झालेली आहे, त्यामुळे पुसेसावळी जिल्हा परिषद गटात पक्षाचे उमेदवार कोण असणार आहेत याची चर्चा रंगायला लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार उभा राहिल्यास याचा फायदा कोणाला होणार! आणि तोटा कोणाला होईल? हे आत्ता तरी सांगणे कठीण आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या सर्वच नेत्यांना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून, जुन्या-नव्या वादांवर पडदा टाकून बेरजेचे राजकारण करणे गरजेचे आहे. त्यातच पुसेसावळी जिल्हा परिषद गटात काही नवीन गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या गावांचा मेळ घालणेही आपल्याला विजयापर्यंत पोहोचू शकते, असे जाणकार कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नेतेमंडळींना आपला कस दाखवावा लागणार आहे.