रुग्णांना प्यावं लागतंय विकतचं पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:03 PM2017-09-27T13:03:46+5:302017-09-27T13:12:36+5:30
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. यंदा पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट झाला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विकतचं पाणी आणून प्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच आजारपणाने पिचलेले रुग्ण आर्थिक कोंडीत सापडत आहेत.
सातारा, दि. 26 : जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. यंदा पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट झाला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विकतचं पाणी आणून प्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच आजारपणाने पिचलेले रुग्ण आर्थिक कोंडीत सापडत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या इतर चांगल्या सुविधा रुग्णांना मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले पाणी मात्र रुग्णांना मिळत नाही. या शासकीय रुग्णालयाला जीवन प्राधिकरण आणि कास तलावातून पाणीपुरवठा केला जातो.
सिव्हिलमध्ये पाणी साठविण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या आहेत. एका टाकीमध्ये सतत पाणी उपलब्ध असते. मात्र, हे पाणी डायलेसीस विभागाला अत्यंत गरजेचे असते. उलट आहे तेच पाणी डायलेसीस विभागाला पूरत नाही. रोज सरासरी दहा हजार लिटर पाणी डायलेसीस विभागाला लागते. त्यामुळे येथील कर्मचारी पाणीसाठा करून ठेवतात. जर पाणी नसेल तर डायलेसीस रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. या विभागालाही पाण्याची कमतरता पडू देऊ नये, अशी अपेक्षा असते.
वॉर्डामध्येही याहून परिस्थिती वेगळी नाही. साधारण एका वॉर्डामध्ये तीस रुग्ण असतात. त्यांच्यासोबत प्रत्येकी एक नातेवाईक म्हणजे जवळपास साठजण एका वॉर्डामध्ये असतात. तसेच वॉर्डातील कर्मचारी त्यांच्यासोबतीला असतात. या सर्वांना पाण्यासाठी सध्या भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागतंय. यंदा मात्र पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये पाण्याचा अक्षरश: ठणठणाट आहे.
वॉर्डामधील प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकाला पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. ज्यांची परिस्थिती आहे ते नातेवाईक वीस रुपयांची पाण्याची बाटली आणत आहेत. मात्र, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांनी पाणी कोठून आणावे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाइकाने चक्क शौचालयाला वापरतात ते पाणी बाटलीमध्ये भरून आणले.
हा प्रकार एका वॉर्डातील नर्सच्या निदर्शनास आल्यानंतर तिने त्याला थेट वरच्या डॉक्टरकडे जावा आणि त्यांना सांगा आम्ही कसले पाणी पितोय ते, म्हणजे त्यांना समजेल. हा सल्ला ऐकून मात्र संबंधित रुग्णाचा नातेवाईक मान खाली घातला. रुग्णांचे होत असलेले हाल रुग्णालयातील कर्मचाºयांनाही पाहावत नाहीत; पण त्यांचा नाईलाज होत आहे.
एक आठवडा झाला आम्ही सिव्हिलमध्ये आहोत. रोज बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. वॉर्डामध्ये पाण्याची सोय झाल्यास पाण्यासाठी पैसे खर्च होणार नाहीत.
- नारायण साळुंखे,
सातारा, रुग्णाचे नातेवाईक