वर्कशाॅप बंद करून ऑक्सिजन सिंलिडर दिले रुग्णांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:01+5:302021-04-26T04:36:01+5:30
म्हसवड : सध्या जिल्ह्यासह माण तालुक्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा अपुऱ्या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. काही ...
म्हसवड : सध्या जिल्ह्यासह माण तालुक्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा अपुऱ्या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. काही दिवस स्वत:चा व्यवसाय बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, या भावनेतून गोंदवले बुद्रुक येथील व्यावसायिक आत्माराम कदम यांनी ऑक्सिजन सिलिंडर रुग्णासाठी दिला.
याबाबत माहिती अशी की, श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदवले बुद्रुक येथे सामाजिक कार्यकर्ते आत्माराम कदम यांचे निवेदिता ट्रेलर्स वर्क्सचे वर्कशॉप आहे. सध्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असल्याने व ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने त्यांनी त्यांचे वर्कशाॅप बंद ठेवून वर्कशाॅपच्या कामासाठी आणलेले अकरा ऑक्सिजन सिलिंडर माणमधील रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी माण तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांच्याकडे सुपुर्द केले. यामुळे या सिलिंडरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम आत्माराम कदम यांनी केले आहे. या योगदानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, आंधळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, माण तालुका मार्केट कमिटीचे सदस्य तानाजी मगर व भैया कदम उपस्थित होते. भैया कदम यांनी स्वागत केले. बाबासाहेब पवार यांनी आभार मानले.
गोंदवले बुद्रुक येथील निवेदिता ट्रेलरचे आत्माराम कदम यांनी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याकडे ऑक्सिजनचे सिलिंडर सुपुर्द केले. (छाया : सचिन मंगरुळे)
फोटो सचिन मंगरुळे यांनी मेल केला आहे.