पुसेगाव कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:44+5:302021-04-22T04:40:44+5:30

पुसेगाव : पुसेगावसारख्या मुख्य बाजारपेठेच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू आहे. कोरोनामुळे पुसेगावसह तालुक्यात चिंताजनक स्थिती ...

Patients hanged at Pusegaon Kovid Center | पुसेगाव कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा जीव टांगणीला

पुसेगाव कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा जीव टांगणीला

Next

पुसेगाव : पुसेगावसारख्या मुख्य बाजारपेठेच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू आहे. कोरोनामुळे पुसेगावसह तालुक्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील हजारो रुग्ण गेल्या वर्षांपासून याच सेंटरमधून बरे होऊन घरी गेले ही आहेत.

सध्या मात्र वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या पुसेगाव कोविड सेंटरमध्ये वीज गेल्यानंतर रुग्णांचा जीव टांगणीला तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची घाबरगुंडी उडत आहे. या सेंटरमध्ये जनरेटरची सोय नसल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. तसेच या ठिकाणी २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा जीव काहीकाळ धोक्यात येत आहे. त्यामुळे, येथील अतिदक्षता विभागच सध्या सलाईनवर असून हे कोविड सेंटर असुविधांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येत आहे.

पुसेगाव हे या भागातील मध्यवर्ती ठिकाण व मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित निढळ, कटगुण, वर्धनगड, विसापूर,नेर, बुध, तसेच डिस्कळ मोळ भाग येतो. पुसेगाव कोविड सेंटरमध्ये डॉ. आदित्य गुजर व डॉ. पाटील यांच्या माध्यमातून उत्तम वैद्यकीय सुविधा व सेवा उपलब्ध असल्याने उत्तर खटावच्या विविध भागांतून रुग्ण या शासकीय रुग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल होत असतात. मात्र, येथील वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कामामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना त्रास होत होता. आत्ता कोविड बाधित रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

श्वसनाचा त्रास असलेल्या काही कोरोना बाधित रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. तर गंभीर स्थितीत असलेल्या काही रुग्णांना कृत्रिम ऑक्‍सिजन पुरवावा लागतो. तशी व्यवस्थाही या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. मात्र, येथे वीजपुरवठा खंडित होऊन उपचार आवश्‍यक असलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा घटना घडत आहेत.

कोट..

पुसेगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरमध्ये वीज सातत्याने खंडित होणे योग्य नाही. उपचारादरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णालय प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तातडीने उपचार आवश्‍यक असलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. अशा वेळी ताबडतोब वीजपुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे.

- डॉ. आदित्य गुजर, वैद्यकीय अधिकारी, पुसेगाव

कोट..कृषिपंपाच्या विजेबाबतीतही वीजवितरण कंपनीचा मनमानी कारभार चालूच आहे. कृषिपंपाच्या वीज पुरवठ्याचे भारनियमन असते त्या काळात वीज वितरणातील दुरुस्ती न करता, ज्या दिवशी वीज असतेच त्याच दिवशी जाणीवपूर्वक काहीतरी काम काढून वीजपुरवठा चार-पाच तास बंद केला जातो.

-विक्रम जाधव, बागायतदार, पुसेगाव

Web Title: Patients hanged at Pusegaon Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.