जबाबदारी सांभाळणे हीच देशभक्ती
By admin | Published: February 18, 2016 11:03 PM2016-02-18T23:03:56+5:302016-02-19T00:18:02+5:30
नरेंद्र चपळगावकर : भाई वैद्य यांचा ‘दादा उंडाळकर’ पुरस्काराने सन्मान
उंडाळे : ‘अठरा देशांतील सद्य: राजकीय, सामाजिक परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे आपणाला ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतीही चळवळ करण्याची अथवा तरुंगात जायची गरज नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी पारदर्शक व नीटपणे सांभाळणे हीच देशभक्ती असून, असे देशभक्त निर्माण होणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले.उंडाळे येथे थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ३३ व्या स्वातंत्र्य संग्रामसैनिक अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी चपळगावकर यांच्या हस्ते यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार भाई वैद्य यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाबूराव पाटील-किवळकर, गोवामुक्तीचे पतंगराव फाळके, वाशिम येथील स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र देसाई, संयोजक माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, जयसिंंगराव पाटील, अॅड. विजय पाटील, गुलाबभाई बागवान, वाघोजीराव पोळ, दादासाहेब गोडसे, अॅड. जयवंतराव केंजळे, साहेबराव पवार, अॅड. रवी पवार, बाळासाहेब चव्हाण, पुरुषोत्तम माने, पंतगराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.नरेंद्र चपळगावकर म्हणाले, ‘सत्ता पैशाची चाललेली साठमारी पाहिली तर स्वातंत्र्य कशाकरिता मिळविले, हा प्रत्येकाला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भ्रष्टाचाराने देश पोखरला आहे. सार्वजनिक व्यवस्थेची प्रचंड नासाडी सुरू आहे. स्वातंत्र्याचा अर्थच आम्हाला समजला नसून विचार पटला नाही तर आपण काय करतोय. न्यायालयातही मारामारी करतोय ही बाब गंभीर आहे. लोकांना कसलीही सुरक्षा नाही. चाललेली परिस्थिती पाहता लोकांना खरोखरच विचार, संचार स्वातंत्र्य आहे का? हा प्रश्न आहे.’ भाई वैद्य म्हणाले, ‘स्वातंत्र्य ज्या प्रेरणेने मिळविले व त्यामुळे जी मूल्ये रुजली ती फार महत्त्वाची आहेत. ती मूल्ये आपण विसरलो तर देशाच्या स्थैर्यालाच धक्का पोहोचेल. आज देशापुढे दोन महत्त्वाचे व गंभीर प्रश्न उभे आहेत. त्यामधील पहिली धर्मनिष्ठित राष्ट्रनिर्मिती असावी का? व दुसरी शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांच्या आत्महत्या. मात्र या दोन्ही प्रश्नांबाबत आपणाला काहीही देणे-घेणेच नाही. याप्रमाणे आपले आचरण आहे. हे देशासाठी घातक असून, सुजाण मंडळींनी या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. पाकिस्तान, इराक या धर्मनिष्ठ राष्ट्राची अवस्था काय आहे.’ माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी प्रास्ताविक केले. प. ता. थोरात यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)
उंडाळेच्या व्यासपीठाचा गौरव
उंडाळे हे स्वातंत्र्यसैनिकांचे एकमेव व्यासपीठ असून, या व्यासपीठाबाबत आम्हाला आदर आहे. मी या व्यासपीठावर विलासकाका बोलावतील त्या-त्या वेळी आलो आहे. ज्या-ज्या वेळी आलो, त्या-त्या वेळी या भूमीची प्रेरणा घेऊन आणखी जोमाने कामाला लागलो, अशा शब्दांत भाई वैद्य यांनी उंडाळेच्या व्यासपीठाचा गौरव केला. दादा उंडाळकरांचे काम म्हणजे सातारच्या प्रतिसरकारची पायाभरणी असल्याचे गौरवोद्गार काढताना दादांच्या नावाचा पुरस्कार हा मी माझा अभिमान समजतो,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.