निवडीचा मार्ग मोकळा; आता तारखांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:11 AM2021-02-18T05:11:39+5:302021-02-18T05:11:39+5:30
कराड : सरपंच आरक्षणाच्या संदर्भाने दाखल झालेल्या याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने कराड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला ...
कराड : सरपंच आरक्षणाच्या संदर्भाने दाखल झालेल्या याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने कराड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडीच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यावर यंदा प्रथमच सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे अनेक जणांचा भ्रमनिरास झाला. त्यात कराड तालुक्यातील पोतले, वराडे गावातील काहींनी आरक्षणाबाबत याचिका दाखल केली. त्यामुळे होऊ घातलेल्या सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीला जिल्हाधिकाऱ्यांनी १६फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी पूर्ण झाल्याने आता निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर महिन्याच्या आत सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया पूर्ण करायची असते. मात्र, आरक्षणावर आक्षेप घेतल्याने या निवडी पुढे ढकलण्यात आल्या. आता याबाबतची सुनावणी पूर्ण झाल्याने लवकरच निवड प्रक्रिया पूर्ण होणार हे नक्की!
निवड प्रक्रिया गृहीत धरून स्थानिक नेत्यांनी यापूर्वी रणनीती तयार केली होती. काही काठावरच्या ग्रामपंचायतीमध्ये तर सदस्य सहलीवर पाठविण्यात आले होते. मात्र, निवड प्रक्रिया लांबल्याने हे सदस्य गावात पुन्हा परतले. आता पुन्हा निवड तारीख गृहीत धरून नेतेमंडळी या सदस्यांवर बारीक नजर ठेवून आहेत.
तालुक्यात १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत. यापूर्वी दोन टप्प्यात निवड कार्यक्रम जाहीर झाला होता. आता पुन्हाही त्याच पद्धतीने तारखा जाहीर होणार ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या तारखांकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट :
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तारखांबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर कराड तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
अमरदीप वाकडे,
तहसीलदार, कराड