फुटपाथची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:40 AM2021-05-21T04:40:58+5:302021-05-21T04:40:58+5:30
कऱ्हाड : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ...
कऱ्हाड : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
साईडपट्ट्यांची दुरावस्था
कोपर्डे हवेली : कऱ्हाड - मसूर मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या साईडपट्ट्या ठिकठीकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.
सर्रास धूम्रपान
कऱ्हाड : शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली असली, तरी शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांवर धूम्रपान केले जात आहे. मध्यंतरी रस्त्यात सिगारेट ओढणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईत सातत्य राहत नाही. त्यामुळे रस्त्यात धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे.
सुशोभिकरण गरजेचे
मलकापूर : येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ढेबेवाडी फाट्यावर उड्डाण पुलाखाली सुशोभिकरण केले आहे. मात्र कोरोना काळात सुशोभिकरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने तेथील झाडे गायब झाली आहेत. अज्ञातांनी काही रोपे उपटून टाकली आहेत. तर कुंड्यांचीही मोडतोड केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करण्यात आलेल्या या सुशोभिकरणामुळे ढेबेवाडी फाट्यावरील सौंदर्य खुलले होते.