राजेंच्या द्वंद्वात पवारांची कृष्णशिष्टाई अपेक्षित
By admin | Published: December 31, 2016 12:08 AM2016-12-31T00:08:28+5:302016-12-31T00:08:28+5:30
‘राजधानी’तला वणवा जिल्हाभर : ‘जाणताराजा’च्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष
सातारा : पालिका निवडणुकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चांगलेच द्वंद्वयुद्ध पेटले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची जणू मालिकाच काही दिवसांपासून सुरू आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ८ जानेवारी रोजी अजिंक्यतारा कारखान्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणाचे औचित्य साधून या दोन राजेंतील द्वंद्व शमविण्याचा प्रयत्न जाणता राजा करणार की वेगळी घोषणा करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सातारा पालिका निवडणुकीत मनोमिलन तोडण्याचा निर्णय घेऊन खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाला जोरदार धक्का दिला. हेच धक्कातंत्र त्यांनी पुढेही सुरूच ठेवल्याचे सध्या पाहायला मिळते. धक्कातंत्राच्या माध्यमातून उदयनराजेंनी भाजपलाही धूळ चारत पालिकेत सत्ता स्थापन केली. आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांकडे उदयनराजेंचा निशाणा आहे.
पालिका निवडणुकीनंतर सुरुवातीच्या कालावधीत उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद सातारा तालुक्यातही उफाळून येणार, असे मानले जात होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये हे वातावरण आणखी तापणार, असे चित्र जाणवत होते; पण उदयनराजेंनी काढलेले वर्तुळ तालुक्यापुरते मर्यादित नसून ते जिल्हा व्यापणार असे नुकतेच स्पष्ट झाले आहे.
राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीची हाक देत उदयनराजेंनी सर्व पक्षांतील नाराजांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उदयनराजेंचे हे दुसरे धक्कातंत्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदाराने वेगळी भूमिका घेतल्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदार व इतर नेतेमंडळींपुढे पेच निर्माण झालेला आहे.
पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर नाराजांना राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. साहजिकच राष्ट्रवादीला याची चिंता जास्त आहे. सातारा, वाई, कऱ्हाड या तीन तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना ही धोक्याची घंटा ठरणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता असणे साहजिकच मानले जात आहे.
या परिस्थितीत खासदार शरद पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नेत्यांनीच उदयनराजेंना सल्ला द्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांचेच आगामी निवडणुकांत ऐकले जावे, किमान त्यांचे म्हणणे विचारात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या जाव्यात, अशी आमदारांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पवार कशी पूर्ण करतात?, हे पाहण्याजोगे ठरेल. (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षातही अस्वस्थता
खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे भाजपमध्येही अस्वस्थता आहे. पालिका निवडणुकांतील यशानंतर भाजपमध्ये भलतेच बळ संचारले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही मुसंडी मारण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. मात्र, उदयनराजेंनी उपलब्ध करून दिलेल्या पर्यायामुळे भाजपने तिकीट नाकारलेल्यांना संधी दिली जाऊ शकते. उदयनराजेंची ही राजकीय खेळी भाजपला थोपवून धरण्यातही यशस्वी ठरू शकते.