Lok Sabha Election 2019 निवडणूक न लढवताही पवारांना पंतप्रधानपदाची स्वप्ने : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:50 PM2019-04-10T23:50:54+5:302019-04-10T23:51:13+5:30

फलटण : ‘माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे व पाणी हे प्रश्न आम्ही सोडवूच; पण या भागातील विकासाची भूक कायमची मिटविण्यासाठी ...

Pawar's dream of prime minister despite not contesting elections: CM | Lok Sabha Election 2019 निवडणूक न लढवताही पवारांना पंतप्रधानपदाची स्वप्ने : मुख्यमंत्री

Lok Sabha Election 2019 निवडणूक न लढवताही पवारांना पंतप्रधानपदाची स्वप्ने : मुख्यमंत्री

Next

फलटण : ‘माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे व पाणी हे प्रश्न आम्ही सोडवूच; पण या भागातील विकासाची भूक कायमची मिटविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. राष्ट्रवादीच्या कॅप्टनने तर माढ्याच्या हवेचा अंदाज बघून माघार घेतली. निवडणूक न लढवता त्यांना पंतप्रधानांची स्वप्ने पडत आहेत,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
फलटण येथे माढा लोकसभा मतदार- संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार बाबूराव माने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, दिगंबर आगवणे, उत्तमराव जानकर, सह्याद्री कदम, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, नरसिंह निकम, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आताच्या लोकसभेच्या मॅचमध्ये भाजपचे नरेंद्र मोदी कॅप्टन म्हणून ओपनिंगला उतरले असून, ते चौकार-षट्कार लगावत विजय मिळवित आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे कॅप्टन कोठे आहेत? ते माढ्यातून उतरले आणि जनतेचा इशारा बघून बारावा राखीव खेळाडू म्हणून माघारी गेले. त्यांनी माढ्याच्या हवेचा अंदाज बघूनच माघार घेतलीय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गरिबी हटावचा नारा देतात; पण त्यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत देशात सत्ता असताना का गरिबी हटली नाही. काँग्रेसने स्वत:ची व स्वत:च्या कार्यकर्त्यांची गरिबी हटविली. मात्र, मोदींनी गेल्या पाच वर्षांत गरिबांसाठी मोठे काम केले आहे. आज देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या पाकिस्तानलाही मोदींनी त्यांच्या देशात घुसून धडा शिकविलाय. काँग्रेस देशाला फसविण्याचे आणि सैन्यदलाचे खच्चीकरण करण्याचे पाप करत आहे.’
‘माढा लोकसभा मतदार संघातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुसती खोटी आश्वासने, थापा मारण्याचे राजकारण केलेले आहे. येथील जनतेच्या जोरावर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जनतेच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध पाणी प्रकल्प आणि योजनांना आम्ही निधी दिला. नीरा देवघरच्या कालव्याचे हक्काचे पाणी निश्चितच फलटण आणि माळशिरस तालुक्याला मिळेल. तुमच्या हक्काचे पाणी कोणाला हिरावू देणार नाही आणि कोणाला पळवूही देणार नाही. तसेच रेल्वेही कोणाला अडवू देणार नाही. जो कोणी अडवायचा प्रयत्न करेल त्याला जनता धुडकावून लावेल.
रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्यांनी मला फसविण्याचे राजकारण केले. भाजपने मला आणि मागासवर्गीय समाजाला न्याय दिला असून, राष्ट्रवादीला माढ्यामध्ये गाडण्याचेही आवाहनही त्यांनी केले.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘ही निवडणूक पाणी आणि रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी लढवत आहे. जनतेच्या ताकतीवर मी उभा असून, लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे साखरवाडी कारखान्याचा थकबाकीचाही विषय मार्गी लागणार आहे. आपल्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असला तरी फलटणकर जनतेच्या ताकतीवर तो उधळून लावू.’

Web Title: Pawar's dream of prime minister despite not contesting elections: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.