भरणा तारखेदिवशीच वीजबिल हाती... भरणार कधी?
By admin | Published: September 25, 2015 10:34 PM2015-09-25T22:34:54+5:302015-09-26T00:39:39+5:30
ग्राहक त्रस्त : वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर
तारळे : पाटण तालुक्यातील तारळे परिसरात वीजबील वाटपाचा भोंगळ कारभार सुरू आहे. कधीकधी भरणा तारखेदिवशीच बील हाती येत आहे. त्यामुळे बील भरायचे कधी असा प्रश्न निर्माण होत आहे. अधिकारी ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे सोडून प्रत्येकवेळी ठेकेदारांवर खापर फोडून रिकामे होत आहेत. यामध्ये ग्राहक पिचला जात आहे.दरम्यान, दर महिन्याला वीजबील वितरण करणे कंपनीच्या आवाक्याबाहेर असल्याने तीन महिन्यांना वीजबील देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
तारळे विभागात सहा हजारांपर्यंत कंपनीचे ग्राहक आहेत. पूर्वी तीन महिन्यांनी वीजबीले वितरीत करण्यात येत होती. त्यानंतर दोन महिने व काही वर्षांपासून दर महिन्याला ग्राहकांच्या हातात वीज बील मिळत आहेत. प्रत्येक महिन्याला वीजबील वाटपाचे भूत ग्राहकांच्या मानगुटीवर बसवले जाते. कंपनीने स्वत:चा स्वार्थ साधल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
वीजबील भरण्याची मुदत १९ तारीख असताना कधी १८ तारखेला तर कधी बील भरण्याच्या दिवशीच ग्राहकांना वीजबीले मिळाली आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तारळे विभागात गेल्या अनेक वर्षांपासून वीज बील वाटपाचा खेळखंडोबा सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर तक्रारी घालूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने ग्राहकांना कोणी वाली नसल्याचे दिसते. अधिकारी व ठेकेदाराच्या गोंधळात ग्राहकांची मात्र आर्थिक लूट होत आहे.
वारंवार वीज बील वाटपाचा फज्जा उडत आहे; पण अधिकाऱ्यांकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. आता दाद तरी कोणाकडे मागायची, हा प्रश्न ग्राहकांसमोर उभा आहे. (वार्ताहर)
बिलांचे अंदाजे वाटप...
ाीजबिलावर फोटो नसल्याने मोघम बील देणे, मीटर नादुरूस्त दाखविणे अशा प्रकारची बीले हातात मिळत असून ती दुरूस्तीसाठी वीज वितरण कार्यालयात चकरा माराव्या लागतात. विभागातील काही भागात अजूनही वीज बीले मिळाली नाहीत. भरलेली बिले पुन्हा पुढच्या बिलात वाढवून येत आहेत. अशा तक्रारी ग्राहकांमधून करण्यात येत आहेत.
बील वाटपाच्या गोंधळामुळे ग्राहकांची ससेहोलपट सुरू आहे. ग्राहकांच्या आर्थिक नुकसानीबाबत वरिष्ठ अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. स्वार्थ साधण्यासाठी वीज कंपनीने दर महिन्याला बीले वाटण्याची खेळी केली असली तरी ग्राहकांना पारदर्शक सेवा देण्यात अपयशी ते ठरले आहेत. प्रत्येक महिन्याला वीजबील देणे कंपनीला शक्य नसल्याने आता पूर्वीप्रमाणे दर तीन महिन्यांनी वीज बीले वाटण्यात यावी व ग्राहकांची फरफट थांबवावी.
- संजय शिंदे, ग्राहक