वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयाने उतरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:50+5:302021-07-19T04:24:50+5:30

सातारा : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर स्थिर असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयांनी ...

Peanut price falls by Rs 300 per quintal ... | वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयाने उतरला...

वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयाने उतरला...

Next

सातारा : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर स्थिर असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयांनी उतरला आहे. बाजार समितीत क्विंटलला ७ हजारापर्यंत दर मिळाला. त्याचबरोबर कोबी, टोमॅटो आणि वांग्याला भाव कमी मिळत असल्याचे दिसून आले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ६२७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची १३० क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० पासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते १०० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १५० ते २०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला १५०० पर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. आले अन् लसणाचा दर आणखी कमी झाला. त्याचबरोबर वाटाण्याला क्विंटलला ६ ते ७ हजारापर्यंत दर मिळाला.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील सवा महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २३०० ते २४०० पर्यंत मिळत आहे. तर पामतेलाचा १८५०, शेंगदाणा तेल डबा २२५० ते २४०० आणि सोयाबीनचा २१०० ते २२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५०, सूर्यफूलो १७० रुपयांना मिळत आहे.

आंब्याची आवक...

बाजार समितीत आंबा आणि डाळिंबाची आवक चांगली झाली. आंबा ५० तर डाळिंब आवक १६ क्विंटल झाली. तसेच पपई व सफरचंदचीही आवक झाली होती.

बटाटा स्वस्तच...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झाले. पण बटाट्याला अद्यापही दर एकदम कमी आहे. क्विंटलला १२०० ते १३०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला २५० ते ३००, ढबू २०० ते २५०, शेवगा शेंग ४०० ते ५००, गवारला २०० ते ३०० रुपये १० किलोला मिळाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया...

मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. डब्याबरोबरच पाऊचचेही दर उतरले आहेत. यामुळे अनेक महिन्यांनंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले होते. पण, या आठवड्यात थोडा उतार आला आहे. वांगी, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर आवाक्यात आला आहे. पण, अजूनही गवार शेंग आणि वाटाणा महागच मिळत आहे.

- प्रमोद पाटील, ग्राहक

मागील दीड महिन्यापासून वाटाण्याला चांगला दर मिळत होता. पण, आता थोडा कमी झाला आहे. त्यातच कोबी, वांगी, टोमॅटोलाही भाव कमी आहे. यामुळे भाजीपाल्यावर केलेला खर्चही निघत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

- संतोष पवार, शेतकरी

.............................................................................................................................................................................................

Web Title: Peanut price falls by Rs 300 per quintal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.