वाटाणा पोहोचला सात हजार रुपये क्विंटलपर्यंत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:58+5:302021-04-10T04:38:58+5:30
सातारा : मागील काही दिवस क्विंटलला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळणाऱ्या वाटाण्याचा भाव वाढला आहे. सातारा बाजार ...
सातारा : मागील काही दिवस क्विंटलला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळणाऱ्या वाटाण्याचा भाव वाढला आहे. सातारा बाजार समितीत तर चार महिन्यांनंतर वाटाण्याला क्विंटलला ७ हजारांपर्यंत भाव मिळू लागलाय. मात्र, दुसरीकडे कांद्याचा दर आणखी कोसळला. एक नंबरच्या कांद्याला क्विंटलला अवघा १२००पर्यंत दर मिळत आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ५१३ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला २००पासून १२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील महिन्यापूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर दर एकदमच गडगडला आहे.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ५३ वाहनांतून ५८० क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा १०५, लसूण २० आणि आल्याची ३९ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला १०० ते १५० रुपयांपर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आहे, तर वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टमाटा ५० ते ८०, कोबीला ३० ते ४० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे, तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १५० आणि दोडक्याला २५० ते ३०० रुपये भाव आला.
बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर अजूनही स्थिर आहे. शेतकऱ्यांना दरात वाढीची अपेक्षा आहे, तर हिरव्या मिरचीला क्विंटलला अडीच हजारापासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे, तर लसणाला क्विंटलला २ ते ६ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही स्थिर राहिला आहे.
मागील चार महिन्यांपासून वाटाण्याचा दर कमी झाला होता. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला दीड हजारांपर्यंत दर मिळत होता. मात्र, मागील १५ दिवसांत दरात सुधारणा झाली. वाटाण्याला सध्या ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अजूनही कांदा, टमाटा, वांगी, कोबीचे दर कमीच आहेत. यामुळे बळीराजांत निराशा आहे.
चौकट :
मेथी भाव खाऊ लागली...
सातारा बाजार समितीत गुरूवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. मेथीच्या १२०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ५०० ते ७०० रुपयांदरम्यान मिळाला. तर पालकला शेकडा ३०० ते ४०० रुपये भाव मिळाला. सध्या मेथीला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.
......................................................