साताऱ्यातील पेढे व्यावसायिकाला परदेशातून 30 लाखांच्या खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 09:47 PM2021-11-16T21:47:59+5:302021-11-16T21:48:26+5:30
खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवण्याची धमकीही देण्यात आली आहे.
सातारा: सातार्यातील पेढ्याच्या व्यावसायिकाला गेल्या आठ दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून तीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली जात आहे. तसेच, खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मोदी असे पेढा व्यावसायिकाचे नाव आहे. मोदी यांना गेल्या आठ दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत आहेत. तीस लाख रुपये दे, नाहीतर बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना रात्री-अपरात्री देखील फोन येण्याचे तसेच मेसेज करुन वारंवार तीस लाख रुपये देण्यासाठी धमकावले गेले.
सुमारे 10 ते 12 कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलिस मुख्यालयात याबाबत ई-मेल करुन तक्रार अर्ज पाठवला. या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडण्यात आले आहेत. वेगवेगळ्या दोन नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी प्रशांत मोदी यांनी सायबर पोलिस विभागात जाऊन माहिती दिली. आता या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.