गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

By admin | Published: September 13, 2015 09:48 PM2015-09-13T21:48:11+5:302015-09-13T22:14:46+5:30

अखेर रामराजेंचा शब्द खरा : १२१ किलोमीटर अंतर पार करून प्रकल्प यशस्वी

Peeping Pomegranate | गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

Next

वाठार-निंबाळकर : धोम-बलकवडी धरणाचे पाणी अखेर फलटण तालुक्यातील गिरवी या गावी पोहोचले. तब्बल २० वर्षांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडीचे पाणी तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांच्या बागेला देणार असल्याचा शब्द दिला होता. तो अखेर खरा-खुरा ठरला. फलटण तालुक्यातील १२८ गावांपैकी ३६ गावे नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहेत. ती वगळता उर्वरित गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जात. त्या गावांच्या शेतीपाणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी आपल्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात फार परिश्रम घेतले होते; मात्र त्यांना यश आले नव्हते.१९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याच पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून आपण चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला पाणी देणार, असे प्रचारात वेळोवेळी अश्वासन दिले होते.१९९५ मध्ये युती शासनाला अपक्ष आमदारांची गरज सत्तेसाठी होती. ही गरज ओळखून रामराजेंनी अपक्ष आमदार एकत्रित करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले. धोम-बलकवडी व नीरा-देवघर ही दोन धरणे बांधून घेतली. पुढे सत्तांतर होऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले. यावेळी रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी अथक परिश्रम घेऊन धोम-बलकवडी धरणाचे काम पूर्ण करून व प्रत्यक्ष कालव्याचे काम सुरू करून धोम-बलकवडीचे पाणी ठिकठिकाणी बोगदे पाडून फलटण तालुक्यात आणले.फलटण तालुक्यात पाणी आल्यानंतर आदर्की येथे दिवंगत चिमणराव कदम व शंकरराव जगताप तसेच माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले होेते. वेगवेगळ्या अडचणींमुळे गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी वेळ लागत होता. तरीही रामराजेंना चिमणराव कदम यांच्या हस्ते कार्यक्रमांमध्ये गिरवी गावात पाणी पूजन घ्यायचे होते. सध्या गिरवी गावात ‘गुरवदरा’ नावाच्या तलावात पाणी सोडले आहे; मात्र, गावात आलेले पाणी पाहण्यासाठी चिमणराव कदम हवे होते. कारण या पाण्यासाठी त्यांनी ही अथक प्रयत्न केले होते, अशी हळहळ आज गिरवीकर ग्रामस्थांनी व्यक्त केली. (वार्ताहर)


शेतकऱ्यांमध्ये आनंद
गिरवी गावात १२१ किलोमीटर अंतरावर धरणापासून पाणी येण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये पाणी गिरवीत पोहोचले होते. सध्या फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ असून, गिरवी ग्रामस्थांनी चारा छावणीची मागणी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. यात धोम-बलकवडीचे पाणी गिरवी गावात पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मात्र जुनी जाणते मंडळी आपापसात बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यात १९९५ मध्ये आमदारकी लढविताना तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून स्वर्गीय ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंब बागेला पाणी दिले,’ अशी आदराची भावना व्यक्त केली.

Web Title: Peeping Pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.