अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहताहेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:48+5:302021-07-31T04:38:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसे हिरावून नेली. कष्टाने उभे केलेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसे हिरावून नेली. कष्टाने उभे केलेले घर, पेरलेले पीक अन् पाळीव जनावरे मातीत गाडली गेली. एवढे सारे झाले असले तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसे पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करताहेत!
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने मदत कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखा येथे करण्यात आली आहे. या शाखेचे पथक प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते या असून, जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्था तसेच नागरिकांनी मदत द्यावयाची असेल त्यांनी जिल्हा पुरवठा शाखेत मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले, त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचणे आवश्यक असल्याने बिस्कीट, चिवडा, फरसाण, राजगिरा लाडू या स्वरूपामध्ये स्नॅक्स तसेच साखर, तांदूळ, आटा, डाळ, तेल, तिखट, मीठ इतर कोरडा शिधा तसेच ब्लँकेट, चादरी, टॉवेल, ताडपत्री अशा स्वरूपाची मदत करण्याचे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले होते.
जिल्ह्यातील सामाजिक संघटना व नागरिकांनी या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादानंतर जमा झालेली मदत तातडीने पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पाठविण्यात आली. ही मदत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत गरजूंना वाटप करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून २४ जुलैच्या शासन निर्णयानुसार पूरबाधित कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लीटर केरोसीनचेही वाटप करण्यात आले आहे. वाटप हे ग्रामदक्षता समिती सदस्यांसमोर करण्याची सूचना देण्यात आली असून, वाटपात गैरप्रकार केल्यास संबंधितावर गंभीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांसाठी मदत दिली आहे. यामध्ये सातारा तालुका रेशन दुकान संघटना, शंकर बर्गे, सुलतानवाडी ता. कोरेगाव, संजय निकम, जयंत गरज, कोविड डिफेडर ग्रुप, सातारा, मच्छिंद्र गोरे, सातारा, हेमंत त्रिगुणे, श्रीकांत शेटे, सातारा, तहसील कार्यालय, सातारा, पार्ले-जी कंपनी, शुभम-इन हॉटेल, क्रेडाई, सातारा, श्री स्वामी सेवा मेडिकल फाउंडेशन, एमएसडब्ल्यू महाविद्यालय, जकातवाडी, अण्णासाहेब कल्याणी माजी विद्यार्थी बॅच, जाणीव विकास स. संस्था, दिलीप देशमुख, मे. पालेकर फूड, विठ्ठल भोसले, कांचन शेटे, राजधानी हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असो. सातारा, कोडोली कृतज्ञता मंच व कोडोली ग्रामस्थ, बौद्ध विकास तरुण मंडळ लिंब, मार्सिया मेटर इंडिया, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, वसुंधरा पर्यावरण संस्था व सातारा व कोरेगाव येथील शासकीय गोदामातील व वाहतूकदारांचे हमाल कामगार यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जिल्हा पुरवठा कार्यालयात जमा केली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील छोट्याछोट्या मित्र मंडळांनी, सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपापल्या परीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पुनर्वसनाचे काम करण्यावरही भर
पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असल्याने बाधित लोक भयग्रस्त असून आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या लोकांनी नोडल अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडेही मागील आठवड्यात हीच मागणी करण्यात आलेली होती.
३०पाटण
फोटो ओळ : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.