भल्या पहाटे डोंगरावर ग्रामस्थांची धडपड !
By admin | Published: April 19, 2017 03:07 PM2017-04-19T15:07:13+5:302017-04-19T15:07:13+5:30
वॉटर कप जिंकणारच : जायगावकरांचा निर्धार; गट-तट विसरून गावकरी एकत्र, पाणीदार गावासाठी कंबर कसली
आॅनलाईन लोकमत
औंध (जि. सातारा), दि. १९ : जानेवारी, फेब्रुवारी महिना आला की ओढे, नाले आटतात. साडेतीनशे, चारशे फुटावरील कुपनलिका कोरड्या पडतात. पाणीटंचाईमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरशीही नाते दृढ झालेले. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रचंड चटके सोसलेले जायगावकर पाणी बचतीसाठी कमालीचे जागृत झाले. त्यातूनच गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आहेत. भल्या पहाटे ग्रामस्थ डोंगरावर जाऊन काम करीत आहेत.
जायगावला मोठी नैसर्गिक देणगी लाभली आहे. उत्तर दिशेचा अपवाद वगळता तीन्ही बाजुंनी डोंगर आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणी अडवले नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. दरवर्षी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या चार वर्षांत कूपनलिका खोदून काही जणांनी पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाण्याची पातळी खालावल्यामुळे कुपनलिका कोरड्या पडल्या असून पाण्यासाठी घातलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या जायगावकरांना पाण्याचे महत्त्व समजल्याने गाव व परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला.
या जलसाक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी लहानांपासून आबालवृध्द सरसावले आहेत. भल्या पहाटे टिकाव, खोरे, पाटी घेऊन लोक डोंगर गाठतात. पाणी फौंडेशनची गावात धूम असून ओढ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी (डिप सीसीटी) समतल चर खोदण्याचे काम सुरू आहे. गाव पाणीदार करुन वॉटर कप जिंकायचा या इषेर्ने झपाटलेले ग्रामस्थ गावातील राजकीय मतभेद गटतट बाजूला सारून खांद्याला खांदा लावून पाण्यासाठी राबत आहेत. शेकडो ग्रामस्थ डोंगरावर समतल चर खोदण्याचे काम करीत असल्याने डोंगर माणसांनी गजबजून गेले आहेत. (वार्ताहर)
शासनावर अवलंबून न राहता देणगी...
पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेत ग्रामस्थांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली असून श्रमदानाबरोबर लोकवर्गणीतून गाळ काढणे, खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निधीसाठी शासनावर अवलंबून न राहता सर्व स्तरातून लोकांनी देणगी गोळा करून कामाला वेगाने सुरूवात केली आहे.
पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग...
पाणी फौंडेशनच्या कामाला गती आल्याने गावागावात पाणीदार चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुध्दा सरसावले आहेत. पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, तहसीलदार पवार-काडीर्ले याशिवाय औंध पोलीस स्टेशनची टीमसुध्दा या पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेत सहभागी झाली आहे.