खटावमधील जनता कर्फ्यू आणखी कडक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:46+5:302021-05-01T04:36:46+5:30
खटाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच वाढती रुग्ण संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची ...
खटाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच वाढती रुग्ण संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची वाढती संख्या खटावकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत तसेच दक्षता समितीने जनता कर्फ्यू कडक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचे नियम पाळत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच अमर देशमुख, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, अशोक कुदळे, दीपक घाडगे, असलम पठाण, आयुब मुल्ला, दीपक विधाते, केशव धुमाळ, मुसा काझी उपस्थित होते.
खटाव येथे काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत्या प्रमाणावर दिसून येत आहे. विनाकारण मेडिकल किंवा दूध आणण्याचे कारण सांगत रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने प्रत्येक चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर करडी नजर तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या १५ दिवसांपासून खटाव व परिसरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्यासाठी राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सहा दिवस बंद कडक ठेवण्याचा व नागरिकांना पाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कॅप्शन नम्रता भोसले यांनी मेल केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी खटावमध्ये दक्षता कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये कडक निर्बंध पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. (छाया : नम्रता भोसले)