लोकप्रतिनिधींनी भान ठेवून काम करावे : हेमंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:03+5:302021-06-16T04:50:03+5:30
सातारा : मतदानाकरिता ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी लोकांच्या दारात जाऊन मतांची भीक मागत असतात. त्याच मतांच्या भिकेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे ...
सातारा : मतदानाकरिता ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी लोकांच्या दारात जाऊन मतांची भीक मागत असतात. त्याच मतांच्या भिकेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे नंतर मतदार संघातील मतदारांकडे दुर्लक्ष होते. वास्तविक कोरोना संकट काळात लोकप्रतिनिधींनी मतदारांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी भान ठेवून काम करावे अन्यथा त्यांना मतदार जागा दाखवतील, असे मत पत्रकाद्वारे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पाटील यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे कऱ्हाड उत्तर मतदार संघात दुर्लक्ष झाले आहे, असेही म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधी ज्या तिडकीने लोकांच्या दारात जात असतात, लोकांना आर्जव करत असतात. त्याच लोकांच्या निवडून दिलेल्या नेत्यांकडून अपेक्षा असतात. लोकप्रतिनिधींकडून मात्र या अपेक्षा फोल ठरु लागल्या आहेत. जगात कोरोना महामारीचा विळखा पडलेला आहे. त्या विळख्यातून सुटण्यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो आहे, प्रयत्न करतो आहे. अशाच संकटातून सुटण्यासाठी प्रत्येकाला मदतीची गरज आहे. गावाेगावी हेच चित्र निर्माण झालेले असताना, ज्या लोकांनी निवडून दिले त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी मतदानावेळी जसे फिरतात तसे आता फिरत नाहीत. त्यांच्याकडून मदत होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी फक्त शासकीय बैठकांमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळते. गाव पातळीवर जाऊन लोकांना आधार देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कऱ्हाड उत्तरचे आमदार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे तर मंत्री झाल्यापासून मतदारसंघात फिरायचे कमी झाले आहेत. त्यांच्याकडून लोकांच्या गाठीभेटी होत नाहीत. ज्या प्रमाणात मदत द्यायला पाहिजे, ती दिली जात नाही, असाही आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.