नंदनवनात ‘वाहतूक कोंडी’चा बारमाही हंगाम
By Admin | Published: July 1, 2015 09:25 PM2015-07-01T21:25:35+5:302015-07-02T00:26:16+5:30
महाबळेश्वरात पर्यटकांची परवड : पालिकेचे दुर्लक्ष; पोलिसांचीही शिट्टी बंद; स्थानिकांमधूनही नाराजी
अजित जाधव -महाबळेश्वर -महाराष्ट्राचे नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वरला सध्या वाहतूूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे. बारमाही हंगाम असल्याने याठिकाणी पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठ, पूनम चौक, वेण्णा लेक अशा सर्वच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून पर्यटक, प्रवासी व टॅक्सीचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे चित्र सध्या दिसत आहे. ही समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महाबळेश्वरसह पाचगणीला दरवर्षी सुमारे २० लाख पर्यटक भेट देतात. बारमाही हंगाम असल्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल असते. महाबळेश्वरला आल्यानंतर पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसा वाया जात असल्यामुळे पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत आहे. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर मुख्य बसस्थानकापूसन ते वेण्णा लेक मार्गावर वाहनांच्या मोठी रांग लागते. त्यामुळे पर्यटक व स्थानिक टॅक्सीवाल्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. शहरातील मुख्य पूनम चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. याठिकाणी असणारी दुकाने, विक्रेते यामुळे ही समस्या अधिकच बिकट होत आहे. पालिका, पोलीस प्रशासनाने योंबाबत ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी होत आहे.
वाट काढण्यात जातो दिवस...
महाबळेश्वरातील टॅक्सीचालक वाहतुकीच्या कोंडीमुळे मेटाकुटीला आले आहेत. एक टॅक्सीचालक दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पर्यटकांना महाबळेश्वरची सफर करवतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे एकाच ट्रीपवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वादावादीचे प्रकारही घडत आहेत. वाहतूक कोंडीमुळे एसटीचे वेळापत्रक बदलत असून, याचा प्रवाशांनाही फटका बसत आहे. पर्यटक व स्थानिकाचा या कोंडीतून वाट काढण्यात संपूर्ण दिवस वाया जात असून, काही पर्यटक या त्रासाला कंटाळून परतीचा प्रवासही करीत आहेत.
सिग्नल यंत्रणा धूळखात!
या समस्यांवर उपाय म्हणनू महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा धूळखात पडलेली आहे. हे सिग्नल वेण्णा लेकच्या दिशेने येणारी वाहने, मेढा मार्गे येणारी वाहने, शहरातून येणारी वाहने माखरिया गार्डनजवळ बसविण्यात आली आहे. तर दुसरी सिग्नल यंत्रणा पंचायत समितीसमोर इराणी पेट्रोल पंपजवळ बसविण्यात आली आहे. हे सिग्नल बसविण्यात आल्यानंतर दोन दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, पुन्हा तिसऱ्या दिवसांपासून याकडे कोणीही लक्ष नाही.