मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणीसाठी चार महिन्यांचा कालावधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:45+5:302021-03-27T04:40:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सवलत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सवलत जाहीर केली आहे. मुद्रांक शुल्क भरून ठेवलेल्या दस्तऐवजांची नोंदणी पुढील चार महिन्यांत केव्हाही करता येणार असल्याने नागरिकांनी विजन निबंधक कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी बी. के. खांडेकर यांनी केलेले आहे.
खांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दिनांक ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता सातारा जिल्ह्यातील एकूण पंधरा दुय्यम निबंधक कार्यालयात ही सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. वास्तविक, मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम २३ नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी नकळत करतात. नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्यात यावा, तसेच धोरणाच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे कारण यात पालन करावे, असे आवाहन खांडेकर यांनी केले आहे.