जिल्ह्यातील तस्करांना लावला कायमचा लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:40 PM2019-09-07T23:40:44+5:302019-09-07T23:40:48+5:30
दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क परराज्य व परजिल्ह्यातून दारूची तस्करी करणाऱ्या सराईतांना कायमचा लगाम लावल्यामुळे दारूची तस्करी रोखण्यात ...
दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परराज्य व परजिल्ह्यातून दारूची तस्करी करणाऱ्या सराईतांना कायमचा लगाम लावल्यामुळे दारूची तस्करी रोखण्यात यश आले. रात्री-अपरात्री होणाºया दारूच्या चोरट्या वाहतुकीवरही आळा घातला गेला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे गावठी दारूची होत असलेली विक्री कमी करण्यास यश आले. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील यांच्याशी केलेली बातचित..
प्रश्न : दारूची तस्करी रोखण्यासाठी नेमके काय केले?
उत्तर : दारूच्या तस्करीमध्ये ज्यांची नावे वारंवार पुढे येत होती. त्या लोकांची आम्ही यादी तयार केली. अशा लोकांना हद्दपारही केले. त्यामुळे पूर्वीप्रमाणे परराज्यातून होत असलेली तस्करी आता होत नाही. पैशांच्या लोभापायी अनेकजण दारू तस्करीमध्ये येत असतात; परंतु अशांवर कडक कारवाई केल्यानंतर पुन्हा त्यांची हिम्मत होत नाही. आमच्या विभागाची अशा लोकांवर सूक्ष्म नजर असते.
प्रश्न : गोव्यातून मद्याचा साठा सातारा जिल्ह्यात येतो का?
उत्तर : गोव्यातून बाहेर येताना सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथे तपासणी केंदे्र असतात. तसेच टोलनाक्यावरही तपासणी होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचा साठा येत नाही. पूर्वी गोव्यावरून दारूची तस्करी होत होती. परंतु आता ही परिस्थिती कडक तपासणीमुळे पूर्णपणे बदलली आहे.
प्रश्न : कारवाई कशी केली जाते?
उत्तर : दिवसापेक्षा रात्रीच्या सुमारास दारूची तस्करी केले जाते. त्यामुळे आम्हाला सतर्क राहावे लागते. रात्रीची गस्त घालावी लागते. वाहने तपासून पुढे सोडावी लागतात. भरारी पथकही आमच्या मदतीला असते. विशेषत: या कारवाईमध्ये पोलिसांचेही चांगले सहकार्य मिळते. त्यामुळे कारवाई तत्काळ होतात. दारू दुकानांमध्येही अचानक तपासणी केली जाते. दुकानात साठा किती आहे. चोरट्या मार्गाने साठा येत नाही ना, याची तपासणी आमच्या पथकाला करावी लागते.
शरीरासाठी अपायकारक
हातभट्टी दारू शरीरासाठी अपायकारक असते. त्यामुळे या दारूची कुठेही निर्मिती होऊ नये, यासाठी आमचे पथक काळजी घेते. मांढरदेवची दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यात हातभट्टीचे प्रमाण कमी झाले. वाई तालुक्यामध्ये विषारी दारूमुळे तिघांचा बळी गेला होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही गावोगावी संपर्क ठेवून असतो. परिणामी याची निर्मिती होत नाही.
निवडणुकीत दक्ष राहावे लागते
कोणत्याही निवडणुकीत प्रचंड दक्ष राहावे लागते. गैरमार्गाने दारूची वाहतूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे गस्त घालण्यावर आमचा भर असतो. अधीक्षक अनील चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोटेकोरपणे नियोजन केले जाते. गणेशोत्सवामध्येही सध्या वाहनांची तपासणी केली जात आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील आहे, असेही पाटील यांनी सांगितले.