चोरून विकली त्यांनी दारू ; साताऱ्यात सील केली तीन परमीटबारचे परवाने कायमस्वरूपी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:53 PM2020-04-24T12:53:52+5:302020-04-24T12:57:02+5:30
संचार बंदी असतानाही चोरून दारू विकणा-यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात २४ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामुळे अवैद्य मद्यविक्रीला आळा बसला असल्याचे अधीक्षक चासकर यांचे म्हणणे आहे.
सातारा : लॉकडाऊन सुरू असतानाही तीन परमीटबार चालकांनी लपून-छपून दारू विकल्याचे समोर आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तीनही परमीटबारचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. त्यामुळे इतर बार चालकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे संचार बंदी व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील ४२३ परमिटबारला सील ठोकले आहे. असे असतानाही रहिमपूर, ता. कोरेगाव येथील हॉटेल काका रेस्टोरंट येथे तसचे फलटण तालुक्यातील साठेफाटा येथील हॉटेल अनुराग आणि खंडाळ्यातील युवा बीअर शॉपी या तीन परमीटबार चालकांनी लॉकडाऊनचा आदेश धुडकावून साली तोडून चोरून मद्यविक्री केल्याचे निदर्शनास आले. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन परमीट बार चालकावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिका-यांनी तत्काळ दखल घेत तीनही परमीटबारचे परवाने कायमस्वरूपी निलंबित केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये चोरून दारू विकणा-या बार मालकांचे धाबे दणाणले आहेत.
संचार बंदी असतानाही चोरून दारू विकणा-यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात २४ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामुळे अवैद्य मद्यविक्रीला आळा बसला असल्याचे अधीक्षक चासकर यांचे म्हणणे आहे.