भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:08 PM2020-02-26T14:08:59+5:302020-02-26T14:10:55+5:30
बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मलकापूर : बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगाशिव डोंगर पायथ्याला नांदलापूर गावालगत शिर्के मळा आहे. या मळ्यात राजाराम विष्णू शिर्के, सरपंच रमेश शिर्के यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता सरपंच रमेश शिर्के हे वस्तीवर असताना काही अंतरावरून बिबट्या गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबत आसपासच्या शेतकऱ्यांना सांगितले. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन बिबट्याचा शोध सुरू केला.
रमेश शिर्के यांच्या शेडपासून काही अंतरावर साई मंगल कार्यालयाजवळ राजाराम शिर्के यांचे जनावरांचे शेड आहे. जनावरांच्या शेडात त्यांनी सहा शेळ्या व दोन म्हैस बांधली होती. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे शिर्के यांनी शेळ्यांसह म्हैस शेडमध्ये बांधून ते गावात गेले.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वस्तीनजीक बिबट्या दिसल्याचे समजल्यावर राजाराम शिर्के वस्तीवर गेले. त्यावेळी शेळ्या व जनावरे ओरडत असलेला आवाज त्यांना आला. त्यावेळी बिबट्याचा शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांसह राजाराम शिर्के यांनीही वस्तीकडे धाव घेतली असता बिबट्या शेळ्यांवर हल्ला करीत असल्याचे त्यांना दिसले. सर्वांनी आरडाओरडा करताना बिबट्याने नजीकच्या शेतात धूम ठोकली.
बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. तर एक शेळी जखमी झाली. जखमी शेळीसह इतर बचावलेल्या दोन अशा तीन शेळ्या घेऊन राजाराम शिर्के घरी घेऊन गेले. शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागासह पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वनपाल ए. सी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचा व घटनास्थळाचा पंचनामा केला.