‘पेथाई’ने सातारकर गारठले! : सातारा जिल्ह्यातील चित्र - पारा ९.५ पर्यंत घसरला; सर्वाधिक थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:23 PM2018-12-18T23:23:57+5:302018-12-18T23:31:43+5:30
बंगालच्या उपसागरामधील पेथाई चक्रीवादळ सोमवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टीच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सातारा : बंगालच्या उपसागरामधील पेथाई चक्रीवादळ सोमवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टीच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातही पारा कोसळल्याने सातारकर गारठले आहेत.
राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात घट होऊन थंडी आणखी वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत थंडीचा कडाका अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वाढत्या गारठ्याचा सामना करण्यासाठी सातारकरांनी हिटर आणि शेकोटीचा पर्याय निवडला आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर सर्वपरिचित आहे. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आणि उत्तम पाहुणचारासाठी अनेकांनी महाबळेश्वरला पसंती दिली आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणावर विवाह होत आहेत. लग्नासाठी आलेल्या वºहाडींना गारठा सुसह्य व्हावा, यासाठी मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी ओपन हिटर, काहींनी शेकोटी तर कोणी कोळशाच्या शेगडीचा उपयोग केला आहे. लग्न किंवा स्वागत समारंभात वधू-वरांना भेटल्यानंतर काही काळ या हिटरखाली बसून अनेकांनी गारठा सुसह्य केला.
सातारा शहरातही वाढत्या गारठ्यामुळे सातारकर रात्री उशिरा बाहेर पडणं टाळत आहेत. दिवसभर गारठा जाणवत असल्यामुळे अंगावर स्वेटर घालूनच फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गारठ्यात स्वेटर घालण्याबरोबरच सातारकर कानटोपी, हातमोजे आणि सॉक्स घालणं पसंत करत आहेत.
ढगाळ वातावरणामुळे थंडीचा पारा कमी
गत सप्ताहात दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीची लाट कमी झाली होती. ढगाळ वातावरणात थंडीचा पारा कमी झाला. त्यामुळे गारठा कमी होणार, असं वाटत होतं; पण आता पुन्हा पेथाई चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाले आहेत. गारठ्याची लाट पुन्हा आल्यामुळे पारा कमी होऊन गारठा वाढला आहे.
गत सप्ताहातील तापमान
वार दिनांक कमाल किमान
सोमवार दि. १० डिसेंबर ३२.० १५.४
मंगळवार दि. ११ डिसेंबर ३०.५ ९.५
बुधवार दि. १२ डिसेंबर ३१.२ ११.२
गुरुवार दि. १३ डिसेंबर २८.६ ११.१
शुक्रवार दि. १४ डिसेंबर २६.१ १७.५
शनिवार दि. १५ डिसेंबर २७.३ १८.४
रविवार दि. १६ डिसेंबर २७.१ १५.७
सोमवार दि. १७ डिसेंबर २६.२ ११.४
मंगळवार दि. १८ डिसेंबर २६.१ ११.९