आदर्की परिसरात पेट्रोल दराचा भटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:37 AM2021-05-14T04:37:59+5:302021-05-14T04:37:59+5:30
आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यात गावोगावी मिनी पेट्रोल पंप झाले असून, वाहनधारकांना पेट्रोल भरण्यासाठी शहरात जाणे परवडत ...
आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यात गावोगावी मिनी पेट्रोल पंप झाले असून, वाहनधारकांना पेट्रोल भरण्यासाठी शहरात जाणे परवडत नसल्याने व लॉकडाऊनमुळे मिनी पेट्रोल चालकांनी १२० रुपये लीटर पेट्रोल विक्री सुरू केल्याने फलटण पश्चिम भागात पेट्रोलच्या दराचा भडका उडाल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम भागातील आदर्की महसुली मंडल व अन्य गावांत वाहनधारकास पेट्रोल भरण्यासाठी वाठार स्टेशन, लोणंद, फलटण व अन्य शहरात पंधरा ते तीस किलोमीटर जावे लागते. त्याचा गैरफायदा व कोरोनामुळे लॉकडाऊन फायदा घेऊन बेकायदा पेट्रोल विक्रेते पंपावरून पेट्रोल रात्री किंवा पहाटे चारचाकीतून हजारो लीटर आणून साठा करतात व बाटलीतून विकतात. पुढचा ग्राहक पाहून शंभर रुपयांचे पेट्रोल ११०, ११५, १२० रुपये लीटरने विकले जात आहे.
पेट्रोल सहज उपलब्ध होत असल्याने फिरण्यास बंदी असतानाही काहीजण फिरताना दिसत आहेत.त्यामुळे गावागावात गर्दी होत आहे. स्थानिक प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. तर पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याचा फायदा मिनी पेट्रोल पंप चालक घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आदर्की महसुली मंडलात पेट्रोल दराचा भडका उडाल्याचे चित्र दिसत आहे.
(चौकट)
खिशाला कात्री..
शेतकरी, बेरोजगार, शेतमजूर यांना शेतात जावे लागते. त्यांना पंधरा ते तीस किलोमीटर पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाण्यासाठी परवडत नाही. त्यामुळे खिशाला कात्री लावून मिनी पेट्रोलपंपावरच पेट्रोल भरावे लागते.