दिव्यांविनाच धावते ‘पेट्रोल व्हेईकल’! अपघाताची शक्यता : ब्रेक, इंडिकेटर, पार्किंग लाईटस गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:03 PM2018-06-26T22:03:48+5:302018-06-26T22:05:16+5:30
सातारा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ‘पेट्रोल व्हेईकल’ फुटक्या दिव्यांनीच रात्री-अपरात्री महामार्गावर फिरताना दिसते. या वाहनाचे दिवेच गायब असल्याने रात्रीच्यावेळी या वाहनामुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महामार्गावर कुठलाही अडथळा आल्यास अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणामार्फत पेट्रोलिंग वाहनांची सुविधा केलेली आहे. रस्त्यावर कुठलाही प्राणी मरून पडल्यास त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात.
मात्र, महामार्गावर धावणारे एमएच ११ टी ८७०४ हे वाहन सध्या जागोजागी फिरताना दिसते. या वाहनाच्या ‘बॅक लाईट’ तुटलेल्या आहेत. पाठीमागच्या बाजूला ब्रेक लाईट, पार्किंग लाईट व इंडिकेटर असे तीन लाईटस असतात. मात्र, मागील बाजूच्या लाईटस फुटल्या आहेत. आतील दिवेही तुटून पडले आहेत. त्यामुळे वाहन रस्त्याकडेला पार्क केले तर ते रात्रीच्यावेळी मागून येणाऱ्या वाहनाला दिसू शकत नाही. अथवा महामार्गावरून धावत असताना अचानकपणे वळले तरी मागील वाहन चालकाला इंडिकेटरही दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो.
ब्रेक लाईटही गायब असल्याने अचानक अडथळ्यावेळी हे वाहन थांबले तर मागील वाहनधारकाला पुढील धोका लक्षात न आल्याने या वाहनाला धडक बसू शकते. बहुतांशपणे रात्रीच्या वेळेतच महामार्गावर या वाहनाच्या फेºया होतात. या वाहनावर धडकेच्या खुणाही जागोजागी बघायला मिळतात.रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहन नियमात पाहिजे, अशी अपेक्षा असते. वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी वाहनाला आरसा नसेल तरी दंडात्मक कारवाई करतात. वाहनाला इंडिकेटर नसेल तरीही दंड केला जातो. मग नॅशनल हायवेच्या वाहनांना नियम नाहीत काय? हे वाहन महामार्गावर राजरोसपणे फिरत असले तरी त्या वाहनाची तपासणी केली जात नसल्याचे निदर्शनास येते.
इतर वाहनधारकांनी नियम न पाळल्यास महामार्गावर जागोजागी अडवले जाते. सर्व कागदपत्रे असली अथवा वाहन सर्व नियमांत बसत असले तरी त्यांच्याकडून चवली-पावली वसूल केली जातेच. हे वास्तव असताना पेट्रोलिंगच्या वाहनाने सर्व नियम वेशीला टांगले आहेत. त्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष का? असा सवाल वाहनचालक विचारत आहेत.
हेल्पलाईन नंबरही नाही
या वाहनावर दर्शनी भागामध्ये हायवे हेल्पलाईन नंबर लिहिणे आवश्यक आहे. मात्र या वाहनाच्या मागे हेल्पलाईन नंबर लिहिलेल्या आढळत नाही.
जोपर्यंत हायवेला पेट्रोलिंग करणाºया गाड्या आरटीओचे नियम पाळत नाहीत, तोपर्यंत हायवे अपघातमुक्त होऊ शकत नाही. किमान ब्रेक लाईट तरी पाहिजेत. रेडियम पाहिजे, हेल्पलाईनचा नंबर या वाहनावर पाहिजे. याबाबत योग्य दखल घेणे गरजेचे आहे.
- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष, संकल्प इंजिनिअरिंग व सामाजिक संस्था