पाळीव जनावरे दिवसा मोकाट अन् रात्री गोठ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:56+5:302021-01-13T05:39:56+5:30
सातारा : मालकांशी प्रचंड इमान राखणाऱ्या गायी दिवसभर शहरात रास्तारोको करतात तर काहीवेळा हिरव्या भाज्यांवर डल्ला मारतात. आवडीच्या खाद्यावर ...
सातारा : मालकांशी प्रचंड इमान राखणाऱ्या गायी दिवसभर शहरात रास्तारोको करतात तर काहीवेळा हिरव्या भाज्यांवर डल्ला मारतात. आवडीच्या खाद्यावर ताव मारून त्या दावणीला जाऊन मालकाला आर्थिक सक्षम करतात. शहरातील या मोकाट गायींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या मालकांवर कारवाई होणे आवश्यक बनले आहे.
सकाळी धार काढून झाली की गोठ्यातून बाहेर पडणाऱ्या गायी शहरभर अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. रस्त्यावर मिळेल ते आणि दिसेल ते खाद्य खातात. यामुळे गायींना पोटाचे विकारही वाढू लागले आहेत. काही गायींच्या पोटातून तर चक्क काटे-चमचेही शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढावे लागले आहेत. दिवसभर मालकांशिवाय मुक्तपणे हिंडणाऱ्या या गायी संध्याकाळी मात्र, मालकाचे घर शोधून दावणीला बांधायला जातात. मालकही शहराच्या कचऱ्यावर पोसलेल्या गायींचे दूध चढ्या दराने विकतो.
ज्या गायींकडून महिन्याला हजारो रुपयांची कमाई केली जाते, त्या गायींवर मालक शेकड्यांनीही खर्च करत नसेल. पण गायींचे शेण, मूत्र यासह सर्वांचा बाजार मांडणे त्यांना सहज शक्य होतेय ही शोकांतिका आहे.
चौकट
वाढत्या संख्येला अंधश्रध्देची किनार
शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत वळू आणि मोकाट गायींची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढण्यामागे मोठी अंधश्रध्दा कारणीभूत आहे. भाकड गायी सांभाळण्यापेक्षा त्यांना मोकाट सोडून देऊन मालक निश्चिंत होतात. तर देवाच्या नावाने वळू सोडला जातो. भाकड म्हणून जी गाय मोकाट सोडली जाते. तिला रोजच्या रोज अन्न आणि पाणी मिळविताना संघर्ष कराव लागतो. पोटातील आग शमविण्यासाठी गायी आक्रमक होतात. त्यामुळे त्या गायींना कोंडवाड्यात ठेवणे किंवा ज्यांना गो शाळेत पाठवणे अधिक उत्तम.
पॉईंटर करणे
मोकाट गायी कुठे आढळतात
१. कचराकुंडी परिसरात
२. हॉटेल, रस्त्यावर
३. मंडई परिसरात
४. ढाबा परिसरात
कोट :
मोकाट अवस्थेत फिरणाऱ्या पाळीव गायी रस्त्यात वाहतुकीला अडथळा बनतात. विक्रेत्यांच्या भाजीकडे तिने तोंड नेले तरीही तिच्यावर काठी उगारण्यात येते. परिणामी तिला शारीरिक इजा होते. अशा गायींना औषधोपचारासाठीही न्यायला कोणी धजावत नाही. मुक्या प्राण्यांविषयी ही टोकाची अनास्था क्लेशदायक आहे.
- किरण अहिरे, प्राणीमित्र, शाहूपुरी
फोटो आहे
(जावेद खान )