पेटली मल्हार क्रांतीची मशाल!
By admin | Published: March 16, 2017 11:26 PM2017-03-16T23:26:45+5:302017-03-16T23:26:45+5:30
दहिवडीत धनगर समाज बांधवांचा विशाल मोर्चा; आरक्षण मिळेपर्यंत मशाल तेवत राहणार
दहिवडी : येथील तहसील कार्यालयावर हजारो धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी मल्हार क्रांती मोर्चा काढला. यावेळी मल्हार क्रांतीची मशाल पेटविण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत ही मशाल तेवत ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अहिल्या कन्यांनी अनुसूचित जमाती दाखला मागणीचा अर्ज तहसीलदार सुरेखा माने यांच्याकडे सुपूर्द केला.
सुमारे तीन वर्षांपूर्वी अनुसूचित जमातीत धनगर समाजाचा समावेश करावा, या मागणीच्या अंमलबजावणीसाठी समाज बांधवांनी आंदोलन केले होते. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार सत्तेत होते. या आंदोलनावेळी युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ता आल्यास धनगर समाजाची मागणी पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते.
मात्र, त्यानंतर धनगर समाजाच्या मागणीवर काहीच झाले नाही. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी फक्त घोषणा न देता कृतीशील आंदोलन करण्याचा निर्धार धनगर समाज बांधवांनी केला. त्याचेच पहिले पाऊल म्हणून माणमध्ये प्रत्यक्ष दाखला मागणी अभियानासाठी मल्हार क्रांती मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यावर अहिल्या कन्यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर तहसीलदार सुरेखा माने या तहसील कार्यालयासमोर येऊन मोर्चास सामोऱ्या गेल्या. यावेळी दाखला मागणीचे ७,५५१ अर्ज अहिल्या कन्यांनी तहसीलदार माने यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर हे आंदोलन समाप्त झाले. (प्रतिनिधी)