फलटणला ‘रामराज्य’ची गुढी यंदा दिमाखातच!
By admin | Published: March 21, 2017 11:21 PM2017-03-21T23:21:47+5:302017-03-21T23:21:47+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजीवराजे : निवडीनंतर तालुक्यात समर्थकांकडून जल्लोष
फलटण : जिल्हा परिषदेवर सलग सहावेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच फलटण तालुक्यात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या रुपाने फलटणला ‘रामराज्य’ची गुढी यंदाही दिमाखात उभी राहिली. फलटण तालुक्यावर गेली २५ वर्षे राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर सलग सहावेळा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. त्यांना आत्तापर्यंत सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा योग येत नव्हता. यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने या पदावर संजीवराजेंचा सर्वात ज्येष्ठ व अनुभवी म्हणून दावा होताच. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत रामराजेंनी ‘फलटण तालुक्याला आणखी एक लाल दिवा देतो, मला सर्व जागा जिंकून द्यावे,’ असे आवाहन केले होते. तालुक्यातील जनतेने जिल्हा परिषदच्या सात जागांपैकी सहा जागा राष्ट्रवादीला जिंकून दिल्याने संजीवराजे जिल्हा परिषद अध्यक्ष होणार हे निश्चितच होते. त्यातच सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सर्व सूत्रे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी रामराजे यांच्याकडे सोपविली होती. ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपविली त्याच विश्वासाने रामराजेंनी सातारा जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितही राष्ट्रवादी कॉँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिले. त्यामुळे रामराजेंना विचारात घेऊनच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार, हे निश्चित होते. सातारा जिल्ह्यातून अनेकजण इच्छुक असल्याने बारामतीकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय सोपविला गेला. ज्यावेळी हा निर्णय सोपविला गेला त्याच वेळी संजीवराजे जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, हे निश्चित होते. कारण बारामतीकर फलटणकरांना विशेषत: रामराजेंना डावलू शकत नव्हते रामराजेंनी जे यश जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळवून दिले होत.े त्याचे बक्षीस द्यावेच लागणार होते व शेवटी संजीवराजेंंची निवड निश्चित झाली. (प्रतिनिधी)