फलटणनं जपलाय प्रदीर्घ सत्तेचा वारसा!
By Admin | Published: August 31, 2015 08:59 PM2015-08-31T20:59:26+5:302015-08-31T20:59:26+5:30
जगात राजघराणं सातवे : पणजोबा मुधोजीराजे नाईक-निंबाळकरांचा वारसा पुढे नेतायत रामराजे
सातारा : जगामध्ये सर्वाधिक काळ सत्ता गाजविणाऱ्या दहा राजघराण्यांपैकी ‘टॉप टेन’मध्ये फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा सातवा क्रमांक लागलाय. या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी ७ डिसेंबर १८४१ ते १७ आॅक्टोबर १९१६ असे ७५ वर्षे २५३ दिवस इतका प्रदीर्घ काळ फलटण संस्थानावर अधिराज्य गाजविले. विशेष म्हणजे, त्यांचे पणतू व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत फलटणच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून प्रभाव ठेवून आहेत.फलटण संस्थानातील नाईक-निंबाळकर घराणे पराक्रमी व इतिहास प्रसिद्ध घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सासर, तर छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ आहे. सर्वात जास्त राज्य कारभार करणाऱ्या जगातील दहा राज्यकर्त्यांमध्ये मुधोजीराजे नाईक-निंबाळकर (चौथे) यांचा सातवा क्रमांक लागतो. त्यांच्या खालोखाल गोंदल संस्थानाचे भगवतसिंग साहिब यांचा क्रमांक लागतो. स्वाझीलँडचे राजे सोहुजा यांनी ८२ वर्षे २५४ दिवस, लिपे संस्थानात (जर्मनी) बेर्नाड यांनी ८१ वर्षे २३४ दिवस, विल्यम चौथा हेनबर्ग स्कूलशिगिन (रोमन साम्राज्य) यांनी ७८ वर्षे २४३ दिवस, हेन्रीच अकरावा ग्रीज संस्थान यांनी ७७ वर्षे १०३ दिवस, इद्रिस इब्नी मुहम्मद अल कादरी, मलेशिया यांनी ७६ वर्षे २३९ दिवस राज्य कारभार पाहिला. यांच्यानंतर भारतातील फलटण संस्थानच्या मुधोजीराजेंनी भारतातील सर्वाधिक काळ राज्य कारभार केला आहे.रामराजेंचे आजोबा मालोजीराजे हेही बरीच वर्षे आमदार व मंत्री होते. त्यानंतर हाच वारसा रामराजे नाईक-निंबाळकर समर्थपणे पुढे नेत आहेत. क्रिकेटमध्ये पारंगत असणाऱ्या रामराजेंनी राजकारणाच्या खेळातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. नगराध्यक्षपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द विधानपरिषदेच्या सभापतिपदापर्यंत कायम टिकून आहे. नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, कृष्णा खोरे उपाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री ते विधानपरिषद सभापती असा चढता आलेख रामराजेंनी राखला आहे. संजीवराजे व रघुनाथराजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात यशस्वी ठरले आहेत. (प्रतिनिधी)
युतीच्या काळातही सत्ता हात जोडून...
१९९५ ते १९९९ या काळात युती शासनाची सत्ता होती. याच काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. रामराजेंना या महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. रामराजे सध्या राष्ट्रवादीतील वजनदार नेते आहेत. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रामराजेंना राज्याचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधानपरिषदेचे सभापतीपद मिळाले आहे. पक्षाची सत्ता नसतानाही कधी महामंडळाचे उपाध्यक्षपद तर कधी विधान परिषदेचे सभापतीपद अशा माध्यमातून ‘नॉन स्टॉप’ सत्तेवर राहण्याचा विक्रमही रामराजेंनीच केला आहे.