बारामतीकरांसाठी फलटणचे कालवे अपूर्ण
By admin | Published: February 9, 2017 11:58 PM2017-02-09T23:58:37+5:302017-02-09T23:58:37+5:30
जयकुमार गोरेंचा रामराजेंवर घणाघात : गिरवीत प्रचारास प्रारंभ; दूध संघ, कारखाना, बॅँक देशोधडीला लावली
फलटण : ‘लाल दिव्याची गाडी टिकवून ठेवण्यासाठीच सातारा जिल्ह्याच्या हक्काचे पाणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे पुणे आणि सांगली जिल्ह्याला देत असून, बारामतीकरांसाठीच त्यांनी नीरा-देवघरच्या कालव्याची कामे केलेली नाहीत. गेल्या २५ वर्षांत त्यांच्या सत्तेच्या काळात तालुक्यातील दूध संघ, कारखाना, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅँक देशोधडीला लागले असून, त्यांना मते मागण्याचा आता अधिकारच राहिलेला नाही,’ असा घणाघात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.
गिरवी, ता. फलटण येथे गिरवी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय कॉँग्रेसच्या उमेदवार अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, गिरवी गणातील उमेदवार जयश्री आगवणे यांच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी आयोजित जाहीर सभेत आमदार गोरे बोलत होते. यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव, तुकाराम शिंदे, प्रकाश निकाळजे आदी उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, ‘एकीकडे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोणतीही सत्ता नसताना स्वराज दूध संघ उभा केला. साखर कारखाना काढला, एमआयडीसीला मंजुरी मिळविली तर दुसरीकडे २५ वर्षे अमर्याद सत्ता, मंत्रिपदे, विधान परिषदेचे सभापतिपद एवढे सगळे असतानाही तालुका पाणी प्रश्नासाठी, रस्त्यासाठी झगडतोय, ही दुर्दैवी गोष्ट आहे. २५ वर्षे मंत्रिपदाच्या काळात रामराजेंना भरपूर काही करता आले असते. मात्र, स्वत:चा लाल दिवा व खुर्ची टिकविण्यासाठी ते बारामतीकरांच्या मर्जीप्रमाणे वागू लागले आहेत.
मी माण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न फक्त सात वर्षांत सोडवत आणला असतानाही २५ वर्षांची सत्ता भोगणारे रामराजे नीरा-देवघर व धोम-बलकवडीच्या कालव्यांची कामे करू शकत नाहीत, शेतीला पाणी देऊ शकत नाहीत ही लाजीरवाणी गोष्ट आहे.’
आमदार गोरे म्हणाले, ‘ऐन उन्हाळ्यात येथील कॅनॉल बारामतीकरांची मर्जी सांभाळण्यासाठी बंद ठेवला. बारामतीला पाणी सोडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा-देवघरच्या कालव्याचे काम पूर्ण झाले तर बारामतीकरांना पाणी देता येणार नाही म्हणून त्यांनी कालव्याचे काम केले नाही.
फलटण विकासाच्या बाबतीत का मागे पडला याचे आत्मचिंतन जनतेने करावे. कोणतीही सत्ता नसताना जनतेच्या प्रश्नासाठी झगडणारे रणजितसिंह नाईक-निंबाळकर कोठे व रामराजे कोठे याचा जरूर विचार करावा. तालुक्यातील सहकार उद्ध्वस्त करणाऱ्या राष्ट्रवादी व त्यांच्या नेतेमंडळींना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ,’ असेही गोरे म्हणाले. (प्रतिनिधी)
रामराजेंनी आठवे आश्चर्य पाहावे...
‘मला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कालावधीत शेवटच्या दहा दिवसांत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले. या दहा दिवसांत मी नीरा-देवघरच्या कालव्यासाठी १४२ कोटी रुपये मंजूर केले. धोम-बलकवडीच्या कामांना गती दिली. मी दहा दिवसांत एवढा निधी आणू शकलो तर २५ वर्षांत सत्तेवर असूनही रामराजेंना का निधी आणता आला नाही. का कामे पूर्ण करता आली नाहीत, याचे जरूर उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही उभारलेला कारखाना आठवे आश्चर्य म्हणणाऱ्या रामराजेंनी आता कारखाना कसा चालवून दाखविला व आठवे आश्चर्य कसे करून दाखविले हे पाहावयास जरूर यावे. जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या व घराण्यासाठी सत्ता राबविणाऱ्या राष्ट्रवादीला घरी बसविण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.