फलटण शहर होणार खड्डेमुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:49+5:302021-01-17T04:33:49+5:30
फलटण : फलटण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने याबाबत जनतेतून होत असलेली नाराजी व ‘लोकमत'ने तसेच विरोधकांनी वारंवार या ...
फलटण : फलटण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने याबाबत जनतेतून होत असलेली नाराजी व ‘लोकमत'ने तसेच विरोधकांनी वारंवार या प्रश्नावर उठविलेला आवाज याची दखल घेत नगरपालिकेने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतची निविदा मंजूर झाल्याने लवकरच शहर खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरू करणार आहे.
फलटण शहरातील अनेक भागात मागीलवर्षी भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे खोदकाम करण्यात आले होते, हे काम करीत असताना ते खड्डे व्यवस्थित बुजवले गेले नव्हते. खड्डे बुजवताना माती, मुरूम टाकल्याने तेथे पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. वर्षभर या रस्त्यांवर डांबर न पडल्यामुळे या रस्त्याची अधिक वाईट अवस्था झाली होती.
फलटण शहरातील महत्त्वाच्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून,खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना खूप सावधरीत्या वाहने चालवावी लागत आहेत. अनेकजण खड्ड्यामुळे अपघातग्रस्त होत आहेत. खड्ड्यांची मोठी दहशत वाहनचालकांवर बसली आहे. संपूर्ण शहराचा विचार करता शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणे गरजेचे असल्याचे ‘लोकमत’ने वस्तुनिष्ठपणे मांडले होते. रस्त्याप्रश्नी वारंवार आवाज उठविला होता. नगरपालिकेतील विरोधी पक्षांनी देखील रस्त्याप्रश्नी आंदोलन केले होते. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे नगरपालिकेने रस्त्याची कामे मंजूर करून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून ती मंजूर केली असून, लवकरच शहरातील ६३ रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत, हे कामे दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
चौकट...
चोहीकडे खड्डेच खड्डे...
फलटण शहरातील प्रत्येक रस्ता खराब झाला असून, चोहीकडे खड्डे दिसू लागले आहेत. यावर्षी मोठा पाऊस झाल्याने खड्ड्यांच्या संख्येत वाढ होत गेली आहे. त्यातच पुन्हा भुयारी गटार योजनेची कामे नगरपालिकेने सुरू केल्याने खोदकाम केलेल्या ठिकाणी जाता-येता नागरिकांची खूपच दैना उडत आहे. वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता खड्ड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कोट...
शहरातील ६३ रस्त्यांच्या कामाकरिता १३ कोटी रुपये मंजूर झाले असून, नगरपालिकेने ही कामे दर्जेदार होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केली होती याची निविदा मंजूर झाली असून, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात लवकरच सुरू होतील आणि शहर खड्डेमुक्तीकडे वाटचाल करेल.
-प्रसाद काटकर, मुख्याधिकारी, फलटण
(लोकमत इफेक्ट लोगो वापरणे..)