फलटणला गोरगरिबांसाठी २२५ शिवभोजन थाळी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:12+5:302021-04-19T04:36:12+5:30
फलटण : गोरगरीब जनतेसाठी राज्य शासनाच्यावतीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. फलटण येथील हॉटेल अजिंक्य, हॉटेल मल्हार ...
फलटण : गोरगरीब जनतेसाठी राज्य शासनाच्यावतीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. फलटण येथील हॉटेल अजिंक्य, हॉटेल मल्हार व कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नपूर्णा शेतकरी कँटीन या तीन ठिकाणी प्रत्येकी ७५ थाळी, याप्रमाणे २२५ शिवभोजन थाळी मंजूर करण्यात आल्या आहे. अशी माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीत गोरगरीब जनता व हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्रातील विविध शहरांत व फलटण येथे मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. शहरात तीन ठिकाणी प्रत्येकी ७५ याप्रमाणे २२५ शिवभोजन थाळी मंजूर केल्या आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध केली जाणार आहे.
शासन नियमानुसार, प्रत्येक केंद्रावर ७५ थाळी उपलब्ध केल्या असल्या, तरी आवश्यकता पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व सचिव शंकरराव सोनवलकर यांनी श्रीमंत मालोजीराजे शिदोरीचे माध्यमातून गरज भासल्यास अधिक शिवभोजन थाळी उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती महेश राजमाने यांनी दिली. शासनाच्या वतीने सुरू केलेल्या फलटण शहरातील मोफत शिवभोजन थाळीचा अनेक गरजूंनी लाभ घेऊन समाधान व्यक्त केले आहे, तर हमाल गरजू व अपंग यांनाही शासन नियमांचे पालन करून मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले.