फलटण ते पुणे डेमू रेल्वे सेवा आजपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:41+5:302021-03-30T04:22:41+5:30
फलटण : सततच्या पाठपुराव्याने रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परतीसाठी डेमू रेल्वे सेवा सुरू ...
फलटण : सततच्या पाठपुराव्याने रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परतीसाठी डेमू रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या रेल्वेचा उद्घाटन सोहळा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तहसीलदार समीर यादव, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे रेल्वे अधिकारी आदी उपस्थित होते.
फलटण-पुणेदरम्यान अनारक्षित डब्यांची ही नियमित डेमू सेवा बुधवार, ३० मार्चपासून प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने दिवंगत खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद कुटुंबीय व फलटणकरांमध्ये होत असल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. उदयनराजे भोसले, खा. वंदना चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. सुनील कांबळे, नगराध्यक्षा नीता नेवसे उपस्थित राहणार आहेत.
कोट..
दिवंगत माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी फलटणच्या रेल्वेसाठी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने लोणंद-फलटण-बारामती रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग पूर्ण होऊन प्रत्यक्ष फलटण पुणे रेल्वे सुरू होत असून, फलटणकरांची रेल्वेच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर