फलटण ते पुणे रेल्वेचे स्वप्न पूर्ण - जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:15+5:302021-03-31T04:40:15+5:30

फलटण : दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ...

Phaltan to Pune railway dream come true - Javadekar | फलटण ते पुणे रेल्वेचे स्वप्न पूर्ण - जावडेकर

फलटण ते पुणे रेल्वेचे स्वप्न पूर्ण - जावडेकर

Next

फलटण : दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केले असून, फलटण-पुणे रेल्वे सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला हातभार लागणार आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण, वन, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

फलटण येथील रेल्वे स्टेशनवर फलटण ते पुणे ट्रेनचे व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन झाल्याप्रसंगी प्रकाश जावडेकर बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार गिरीश बापट, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनील मित्तल, पुणे विभागाच्या रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, मंदाकिनी नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, रेल्वेचे अधिकारी, आदी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, पूर्वी मी पुणे पदवीधर मतदार संघाचा आमदार असताना फलटणला वारंवार येत होतो. त्यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांची भेट होत असे. त्यावेळी फलटणच्या रेल्वेसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. त्यांनी रेल्वेचे पाहिलेले स्वप्न त्यांचे सुपुत्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केल्याबद्दल समाधान वाटत असून, फलटण पुणे रेल्वेद्वारे एकमेकांशी सरळ जोडले गेल्याने या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालालाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात जनहिताची कामे सुरू असून, रेल्वेचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलला गेला आहे. सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ होण्याबरोबरच वाय-फायद्वारे सुसज्ज झाल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटणच्या रेल्वेसाठी माझे वडील दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांचे स्वप्न फलटण ते पुणे रेल्वेद्वारे आज पूर्ण होत असून फलटण व आजूबाजूच्या औद्योगीकरणाला, छोटे-मोठे उद्योगधंदे, शेतकरी यांच्या मालाला निश्चितच रेल्वेच्या वाहतुकीमुळे फायदा होणार आहे. लवकरच फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार आहे. रेल्वेसाठी २३ वर्षे सतत संघर्ष करणारे माझे वडील दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर आज आपल्यात नसल्याने त्यांची उणीव उद‌्घाटन कार्यक्रमाला जाणवत असल्याची खंत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यात रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेचे सर्व अधिकारी यांचे मोठे योगदान असून गेले वर्षभर कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा बंद असतानाही फलटण ते पुणे रेल्वे सुरू करून रेल्वे मंत्रालयाने फलटणकरांना अनोखी भेट दिली असून, फलटणची जनता ही कायम रेल्वे अधिकाऱ्यांची ऋणी राहील. अधिकाऱ्यांनी दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे नाव फलटण पुणे रेल्वेला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, रेल्वे हे विकासाचे दालन असून गोरगरीब जनता, विद्यार्थी यांना प्रवासासाठी रेल्वे फायदेमंद आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी कऱ्हाड-सातारा-पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करावेत; तसेच सातारा जिल्ह्यातील रेल्वेचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडवावेत.

चौकट

फलटणच्या रेल्वे स्थानकावरील अपुरी कामे पूर्ण झाल्यावर तसेच कोरोना संपल्यावर ज्यावेळी रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्यावेळी फलटण ते पुणे रेल्वेचा वेग वाढवून फलटण ते पुणे अडीच तासांत प्रवास होणार असून या स्थानकावरून आणखी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी मागणी केलेल्या प्रत्येक कामाला पाठबळ दिल्याने माढा लोकसभा मतदार संघात विकासाचे नवीन पर्व सुरू करता आले आहे.

फोटो - मंत्रालयातून व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविताना प्रकाश जावडेकर, फलटण रेल्वे स्टेशनवर फलटण पुणे रेल्वे सेवेचा प्रारंभ करताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर. खासदार उदयनराजे भोसले, कऱ्हाड येथून खासदार श्रीनिवास पाटील, रेल्वेचे अधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Phaltan to Pune railway dream come true - Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.