फलटण ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:33+5:302021-05-20T04:41:33+5:30
फलटण : फलटण शहरासह तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आणखी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी झिरपवाडी - ...
फलटण : फलटण शहरासह तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आणखी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी झिरपवाडी - गिरवी रोड येथील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत तातडीने दुरुस्त करून कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी त्वरित वापरण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
ग्रामीण रुग्णालय दुरुस्त करून पुन्हा चालू करावे, या मागणीचे निवेदन फलटण तालुका भाजपतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते, किसान मोर्चा शहराध्यक्ष नितीन वाघ, युवा मोर्चा उपाध्यक्ष सोमनाथ यजगर, कुरवलीचे माजी सरपंच धनाजी गावडे, संदीप आढाव, राहुल गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाची पहिली लाट सुरू झाली असताना विविध संघटनांमार्फत सामाजिक कार्यकर्त्यांनी बंद असलेले ग्रामीण रुग्णालय त्वरित चालू करण्यात यावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता हलगर्जीपणा केला तसेच सहा महिन्यांपूर्वी मंत्रालयीन स्तरावरही विविध प्रकारच्या बैठका होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचा अद्याप तोडगा निघालेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना कोणत्याही प्रकारची रुग्णसेवा पुरेशा प्रमाणात मिळत नसताना प्रशासनाने तातडीने ग्रामीण रुग्णालय दुरुस्त करून उपचार केंद्र चालू करायला हवे होते. मात्र, गेली सात ते आठ महिने देखभाल दुरुस्ती आराखडे, अंदाजपत्रक करण्यात येत असल्याचे सांगून इमारत दुर्लक्षित ठेवण्याचे काम प्रशासनाने केले असून, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना आणखी बेड उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरू करावे, रुग्णालयाची इमारत वीस ते पंचवीस वर्षे दुर्लक्षित असल्याने अज्ञातांनी इमारतीचे दारे खिडक्या काढून नेले आहेत, तरी प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती करून कोरोना केंद्र लवकर सुरू करावे, अन्यथा उपोषण, रस्ता रोको, मोर्चा व आत्मदहन यासारखे आंदोलन करण्याचा इशारा बजरंग गावडे यांनी दिला आहे.