फलटणला कापूस खरेदी केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:39+5:302021-03-04T05:13:39+5:30
फलटण : फलटण तालुक्यासह बारामती, माळशिरस या भागात अनेक कापूस उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून किमान आधारभूत ...
फलटण : फलटण तालुक्यासह बारामती, माळशिरस या भागात अनेक कापूस उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शासनाने फलटण येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी विधानसभेत बोलताना केली.
फलटण, बारामती, माळशिरस या भागात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादक शेतकरी होता. त्यावेळी फलटणला कापूस पणन महासंघ होते. त्यानंतर कापूस उत्पादक शेतकरी संघ निर्माण करून या शेतकर्यांना सभासद करून घेण्यात आले; परंतु त्यांना आजवर पणन महासंघाने कोणताही लाभांश दिलेला नाही. त्यानंतर काही कारणांमुळे या भागातील कापूस उत्पादन कमी झाले. अलिकडील काळात या भागात पुन्हा कापसाचे उत्पादन वाढले असून, या शेतकर्यांसाठी फलटणला पुन्हा कापूस खरेदी केंद्र शासनाने जाहीर करावे, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली.
शेतकरी कर्जमाफीवर बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, १९ हजार कोटींची कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारने दिली असून, त्याचा लाभ योग्य शेतकर्यांना झाला आहे. मात्र नियमित कर्जदारांनादेखील कर्जामध्ये सवलत देणे आवश्यक आहे. यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेले ५० हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्यात यावे. अन्यथा प्रामाणिक कर्जदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊन थकबाकीदारांची संख्या आगामी काळात वाढू शकते. शिवाय या कर्जमाफीमध्ये कॅश क्रेडिट कर्जाचाही समावेश करण्यात यावा. कृषीपंप वीज जोडणी विषयावर बोलताना ते म्हणाले, मागील सरकारने शेतकर्यांना वीज कनेक्शन दिले नव्हते. मात्र विद्यमान सरकारने या कामात गती आणली आहे. वीज जोडणी योजनेनुसार थ्री फेजपासून ६०० मीटरच्या अंतरातील वीजजोडणी लगेच होणार असून, ६०० मीटरच्या पुढील अंतरावर सौर पंप देण्यात येणार आहेत.