फलटणला घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प
By admin | Published: April 8, 2017 05:16 PM2017-04-08T17:16:37+5:302017-04-08T17:20:44+5:30
सिंगापूरच्या शिष्टमंडळाची भेट : परिस्थितीचा घेतला आढावा
आॅनलाईन लोकमत
फलटण (जि. सातारा), दि. ८ : फलटण शहरात घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करता येईल का, याची पाहणी सिंगापूर येथील शिष्टमंडळाने केली. हा प्रकल्प उभा करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद शिष्टमंडळाने दिला आहे.
फलटण शहरातून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला जातो. हा कचरा डेपोत आणून गोळा केला जातो. मात्र, त्यावर प्रक्रिया व्यवस्थित केली जात नसल्याने यावर विविध पर्याय शोधले जात होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण स्मार्ट सिटी करायची असून, त्या अनुषंगाने त्यांनी नुकतीच मुंबईतही बैठक घेतली होती. या बैठकीत घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
त्यानुसार शुक्रवारी वीजनिर्मिती करणाऱ्या सिंगापूर येथील एका कंपनीच्या शिष्टमंडळाने फलटण नगरपरिषदेच्या कचरा डेपोला भेट देऊन असा प्रकल्प उभा करता येईल का?, याची पाहणी केली. यास यश आले तर फलटण नगरपरिषदेचे हे क्रांतिकारक पाऊल ठरेल . सिंगापूर स्थित इंपॅक्ट या कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग कॅरीग, असित व कट्रे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
यावेळी नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, आरोग्य समितीचे सभापती जगन्नाथ कुंभार, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती विक्रम जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली निंबाळकर, नगरसेवक अजय माळवे, अनूप शहा, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, दादासाहेब चोरमले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे तसेच फलटण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)