फलटण तालुक्यावर राजे गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:03+5:302021-01-19T04:40:03+5:30

फलटण : फलटण तालुक्यात ग्रामपंचायतींच्या अटीतटीच्या निवडणुकांमध्ये बहुसंख्य ग्रामपंचायतीचे कारभारपण मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजे गटाने पुन्हा एकदा तालुक्याचा ...

Phaltan taluka is dominated by Raje group | फलटण तालुक्यावर राजे गटाचे वर्चस्व

फलटण तालुक्यावर राजे गटाचे वर्चस्व

googlenewsNext

फलटण : फलटण तालुक्यात ग्रामपंचायतींच्या अटीतटीच्या निवडणुकांमध्ये बहुसंख्य ग्रामपंचायतीचे कारभारपण मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजे गटाने पुन्हा एकदा तालुक्याचा गड राखला. खासदार गटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांनी कामगिरी सुधारली आहे.

फलटण तालुक्यात ऐंशी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राजे गट परंपरागत ग्रामपंचायती पुन्हा ताब्यात घेऊन तालुक्यावर पुन्हा वर्चस्व राखण्यास उत्सुक असताना, खासदार गटही ताकद ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून देण्यासाठी सज्ज झाला होता. सर्वच ग्रामपंचायतीत उमेदवार उभे करण्यात ते कमी पडले असले तरी स्थानिक पातळीवर त्यांनी काहींशी जुळवून घेतले होते.

तालुक्यात ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर १३८ सदस्य बिनविरोध निवडून आले होते.

डोंबाळवाडी काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर सांगवी ग्रामपंचायतीचे प्रभाग दोन व प्रभाग तीन, विंचुर्णी ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, बोडकेवाडी ग्रामपंचायती प्रभाग एक, तीन, कोऱ्‍हाळेचे प्रभाग दोन, वडगावचा प्रभाग एक, कोरेगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, जिंतीचे प्रभाग चार, खुंटेत प्रभाग एक, पिराचीवाडीचा प्रभाग तीन, गुणवरे ग्रामपंचायतीचे प्रभाग पाच, आंदरुडचा प्रभाग दोन, मिरढेचा प्रभाग एक, शेरेशिंदेवाडीचा प्रभाग दोन, निरगुडीचे प्रभाग एक, तीन, चार हे बिनविरोध प्रभाग झाले होते.

बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये राजे गटाची संख्या जास्त होती.

तालुक्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असल्याने राजे गटाकडून इच्छुकांची गर्दी जास्त होती. अनेक गावांमध्ये राजे गटाअंतर्गतच दोन ते तीन पॅनेल पडले होते. या पार्श्वभूमीवर बंडाळी होऊ नये म्हणून रामराजे यांनी इच्छुकांशी संवाद साधला होता. पॅनेल उतरविताना नाराजी राहू नये म्हणून प्रयत्न केले, पण बंडखोरी फारशी कमी झाली नाही. काही ठिकाणी राजे गट अंतर्गत दोन गटांत निवडणूक झाली होती. राजे गटाचे बंडखोर निवडून आले तेथे त्यांना ते सामावून घेतात की काय? हे पाहावे लागेल.

साखरवाडी ग्रामपंचायतीत राजे गटाने त्यांच्याच गटाचे विद्यमान सरपंच विक्रम भोसले यांना डावलून पॅनेल उभे केले. तेथे पूर्ण ताकद लावली; मात्र विक्रम भोसले यांनी सतरापैकी आठ जागा जिंकताना राजे गटाला जोरदार धक्का दिला. राजे गटाला आठ जागा, तर प्रल्हादराव साळुंखे-पाटील गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. पाटील गट किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. येथे राजे गटाने प्रस्थापितांना ताकद दिली, मात्र जनतेने परिवर्तन केले.

दुसरीकडे राजे गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाने ग्रामपंचायत लढविण्याचा चांगला प्रयत्न केला. काही ग्रामपंचायतीत त्यांनी संपूर्ण पॅनेल, तर काही ग्रामपंचायतीत ठरावीक उमेदवार दिले होते. त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला. राजे गटाअंतर्गत नाराजांना चुचकारण्याचे प्रयत्न केले; मात्र त्यांना फारसे यश लाभले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार गटाने चांगली लढत देऊन ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद दिली असती तर आणखी जागा वाढल्या असत्या. त्यांना आणखी सुधारणा करण्याचा संदेश जनतेने दिला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मतदान ज्या गावात आहे त्या निंभोरे गावात त्यांना झटका बसला असून, तेथे राजे गटाने एकहाती सत्ता ताब्यात घेतली आहे .

फलटण तालुक्यावर अद्यापही आपलेच वर्चस्व असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले आहे.

चौकट

कोळकीत खासदार गटाला झटका

बहुचर्चित कोळकी येथे राजे गटाने पुन्हा सत्ता कायम राखताना खासदार गटाला झटका दिला आहे. कोळकीत सत्ता आली तरी राजे गटाचे तुषार निंबाळकर यांना राजे गटातील अंतर्गत कुरघोडीमुळे पराभव स्वीकारावा लागला. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी तुषार निंबाळकर यांच्यासाठी ताकद लावली. जनतेने त्यांना साथ दिली नाहीच, मात्र राजे गटांतर्गत तुषार निंबाळकर यांच्या हातात कोळकीची सूत्रे जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. याचा परिपाक म्हणजे तुषार निंबाळकर यांचा पराभव झाला, हा राजे गटाला मोठा हादरा आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या गटाचा कोळकीत पराभव झाला आहे.

Web Title: Phaltan taluka is dominated by Raje group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.